हिंगोली (Hingoli Police) : नववर्षाचे स्वागत सुरक्षित व निर्विघ्नपणे व्हावे, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी सर्वत्र पोलीस यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आली असून कोणत्याही ठिकाणी हुल्लडबाजी करणार्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश (Hingoli Police) जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस यंत्रणेला दिले. नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्या करीता तयारीला लागले आहेत.
जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागत दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने (Hingoli Police) पोलिसांचा सर्वत्र तगडा बंदोबस्त तैनात ठेवला जाणार आहे. दारू ढोसून वाहने चालविणारे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे, महिलांशी गैरवर्तणूक करणारे याचबरोबर बेकायदेशीररित्या दारू विक्री करणारे, आस्थापना, नशेबाजांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील तेराही पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना दिल्या आहेत.
यासोबतच आज २९ डिसेंबर रविवार रोजी पासून सरप्राईज वाहन तपासणी मोहीम सुरू केली जाणार, मद्य वाहतूक करणार्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे प्रकार होऊ नये त्यातून एखादी अनुचित घटना घडू नये यासाठी ब्रिथ अॅनायलायझरद्वारे वाहन चालकांची तपासणी करून मद्य प्राशन करणार्या वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना कोकाटे यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगारावर लक्ष ठेवून संवेदनशिल भागात रात्रीची गस्त तसेच हॉटेल्स, ढाबे व गावालगतच्या शेतामध्ये होणार्या पार्ट्यांवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
असा राहणार बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शना खाली (Hingoli Police) स्थानिक गुन्हे शाखा, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, ५५० होमगार्ड, १ एसआरपी कंपनी, ७५० पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहे.