सर्व संबंधित विभागाने समन्वयाने जबाबदारी पार पाडावी-अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
हिंगोली (Hingoli Revenue Division) : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने दि. 1 ऑगस्ट (Revenue Division) महसूल दिनापासून महसूल पंधरवाड्याला सुरुवात होणार आहे. या महसूल पंधरवाड्यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व संबंधित विभागाने एकमेकाशी समन्वय ठेवून महसूल पंधरवाडा कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी (Hingoli Collector) यांनी आयोजित ऑनलाईन बैठकीत दिले.
महसूल पंधरवाड्यानिमित्त कार्यक्रम आयोजित
अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल पंधरवाडानिमित्त सर्व संबंधित विभागाची आढावा बैठक गुगलमीटद्वारे आज आयोजित केली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, नेहरु युवा केंद्राचे युवा कार्यक्रम अधिकारी आशिष पंत, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, सर्व तहसीलदार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये 1 ऑगस्टला महसूल दिन व महसूल पंधरवाडा शुभारंभ कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्टला कृषि मार्गदर्शन कार्यक्रम, 6 ऑगस्टला शेती, पाऊस आणि दाखले, 7 ऑगस्टला युवा संवाद, 8 ऑगस्टला महसूल-जन संवाद, 9 ऑगस्टला महसूल ई-प्रणाली, 10 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगस्टला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, 13 ऑगस्टला महसूल अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्टला महसूल पंधरवाडा वार्तालाप तर 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व (Revenue Division) महसूल पंधरवाडा सांगता समारंभाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त शासन व सामान्य नागरिक यांना जोडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन या पंधरवाड्यामध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये महसूल विभागाच्या व सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावे, असे आवाहनही (Hingoli Collector) अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी यावेळी केले .