हिंगोली(Hingoli) :- शहरातील अनेक समस्या सोडविण्याबाबत माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने नगर पालिकेत निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.
समस्या सोडवण्याची भाजप शिष्टमंडळाची मागणी
याप्रकरणी ३१ जुलैला मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांना निवेदन देण्यात आले. त्यात नमूद केले की, हिंगोली शहरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळाद्वारे होत असताना बहुतांश वेळा विद्युत पुरवठा (Power supply)हा बंद असतो. परिणामी अनेक नागरिकांना पाण्याविना वंचित राहावे लागते. त्यामुळे महावितरण सोबत समन्वय साधून पाणीपुरवठा शहरात सोडावा तसेच शहरामध्ये लावण्यात आलेले बहुतांश पथदिवे दिवसरात्र चालू राहत आहेत. सध्या पावसाळ्याच्या दिवसामुळे अंधार असल्यास चोर्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बंद असलेले पथदिवे चालू करून नियमित चालू-बंद होतील अशी व्यवस्था करावी, भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने तेथे स्वच्छता करावी, शहरात न.प. तर्फे उभारलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय असून नियमित स्वच्छता करावी, पावसाळ्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले असून डेंग्यू(Dengue), मलेरियाची (Malaria) साथ येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रतिबंधात्मक फवारणी करावी, नगर परिषदेच्या असलेल्या अनेक इमारती सुरक्षा रक्षकाविना असल्याने तेथे अनेक गैरप्रकाराचे कृत्य होत आहे.
किरकोळ व मध्यम स्वरूपाचे अपघात होत असल्याने वादविवादाच्या घटना घडत आहेत
यावर पाबंद घालण्याकरीता उपाय योजना आखाव्यात, हिंगोली शहरात रस्ते गुळगुळीत झाले असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव चालविली जात आहे. त्यामुळे किरकोळ व मध्यम स्वरूपाचे अपघात होत असल्याने वादविवादाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर चांगल्या दर्जाचे गतिरोधक (Speed Braker)बसवावे, शासनाची महत्वपूर्ण असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात शहरातील महिलांना सोयीस्कर व्हावे या अनुषंगाने नोंदणी करण्यासाठी विविध प्रभागातील नियुक्त केलेले कर्मचारी व त्यांचे मोबाईल नंबर त्या-त्या भागात प्रमुख दर्शनी ठिकाणी लावावेत, शहरातील रहदारीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला असून त्या सोबतच मोकाट कुत्रेही सैराट होत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी या नागरी सुविधांबद्दल तात्काळ लक्ष घालून उपाय योजना आखल्या जातील, असे आश्वासन दिले. निवेदनावर माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपा शहराध्यक्ष कैलासचंद्र काबरा, माजी नगरसेवक उमेश गुठ्ठे, सदाशिव सूर्यतळ, हमीद प्यारेवाले, आशिष जैस्वाल, आशिष शर्मा, पराग रमेश जोशी, बाबाराव घुगे, अॅड.राजेश गोटे, सचिन शिंदे, गुड्डे देवकते, करण भंसाळी, रजनीश पुरोहित, अलका लोखंडे, सुमनताई थोरात आदींच्या स्वाक्षर्या आहेत.