उपविभागीय दंडाधिकारी समाधान घुटूकडे यांचे आदेश
हिंगोली (Hingoli State Excise) : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी फाटा या ठिकाणी शेख नशीब शेख युनुस रा. हाताळा ता. सेनगाव जि. हिंगोली हा अवैधरित्या मद्यविक्री करीत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधितावर वारंवार गुन्हे दाखल (Hingoli Crime) करुनही सदर इसमाने अवैध मद्यविक्री सुरू ठेवल्याने दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली यांनी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, हिंगोली यांचेकडे बंधपत्र घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. तदनंतर उपविभागीय दंडाधिकारी हिंगोली यांनी सदर इसमाकडून चांगल्या वर्तवणूकीसाठीचे ५०,०००/- रुपयांचे बंधपत्र घेतले होते.
मात्र त्यानंतरही आरोपी यांनी अवैध दारू विक्री सुरुच ठेवल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर इसमाविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल (Hingoli Crime) करुन बंधपत्र उल्लंघनाबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, हिंगोली या कार्यालयास सादर केला. त्यावर हिंगोली उपविभागीय दंडाधिकारी समाधान घुटुकडे यांनी बंधपत्र भंग प्रकरणी आरोपी शेख नशीब शेख युनुस रा. हाताळा यास ५०,०००/-रुपये शासकीय तिजोरीत जमा करण्याचे व तसे न केल्यास आरोपीस स्थानबध्द करण्याचे आदेश पारित केले. त्याअनुषंगाने आरोपी सदरचा दंड शासकीय तिजोरीत जमा करण्यास चुकला.
हिंगोली उपविभागीय दंडाधिकारी समाधान घुटूकडे यांनी बंधपत्र भंग प्रकरणी आरोपी शेख नशीब शेख युनुस रा. हाताळा याला वॉरंट करुन जोपर्यत सदर आरोपी ५०,०००/- शासन जमा करीत नाही अथवा १४ दिवसांपर्यंत जे आधी घडेल त्या अवधीपर्यंत तुरुंगात पाठविण्याबाबत आदेश पारीत केले. त्यानुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सदर आरोपीची जिल्हा कारागृह परभणी येथे रवानगी करण्यात आली आहे.
“अवैध मद्य विक्री करणे किंवा ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा आहे. याचे उल्लघंन करणाऱ्या ठिकाणांची या विभागाकडून सातत्याने तपासणी सुरु असून याचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कडक कारवाई केली जाईल. तसेच अवैध हातभट्टी, मद्यविक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांचेकडे सादर करण्यात येईल.”
– आदित्य गो. पवार, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली