हिंगोली (Hingoli) :- वसमत शहराला पाणीपुरवठा (Water supply) करणारी सिद्धेश्वर धरण ते वसमत ही मुख्य पाईपलाईन गोळेगाव जवळ फूटली आहे. पाईपलाईन फुटल्याने वसमत शहराला पुन्हा निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे.
दुरुस्ती पर्यंत पुन्हा निर्जळीचा करावा लागणार सामना
सिद्धेश्वर धरण पंप हाऊस ते वसमतशहरा पर्यंत मुख्य पाईपलाईन गोळेगांवजवळ फुटली आहे. रस्त्याचे व पुलाचे खोदकाम करीत असताना पोकलेनच्या फटक्याने पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्याचे समजल्यानंतर पाणीपुरवठा बंद करेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे वसमत शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आहे. त्यातच वारंवार पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत आहेत. पाईपलाईन फूटल्यानंतर दुरुस्ती करण्यात वेळ जातो. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो नागरिकांना निरजळीचा सामना करण्याची वेळ येते असे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाईपलाईन (Pipeline) दुरुस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातात हे खरे असले तरी पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत व पुन्हा पाण्याच्या टाक्या भरून पाण्याचे वितरण होण्यात वेळ जातो. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत होतो बुधवारी पाईपलाईन फुटल्याचे समोर आल्यानंतर वसमत नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे कामाला सुरुवात केली आहे लवकरच पाईपलाईन दुरुस्त होईल असे सांगण्यात आले आहे.