रेती सांडून दोन्ही टिप्पर पथकावर दबाव टाकून नेले
हिंगोली (Hingoli) : सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी ते लिंबाळा रस्त्यावर अवैध रेती प्रकरणात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकामधील तलाठ्यास (Talathi) चापट मारून त्यांच्या अंगावर टिप्पर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सेनगाव पोलीसात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सेनगाव पोलिसात नऊ आरोपीवर गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी पोलीस, महसुल व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (Sub-Regional Transport Department) अधिकार्यांची बैठक घेतल्यानंतर अवैध रेती तस्करी व वाहतुक करणार्यावर परिणामकारक कारवाईचे सत्र सुरू आहे. सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील रेतीच्या घाटावरून अवैध रित्या रेतीचा उपसा केला जात असल्याची माहिती महसुलच्या पथकाला मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज पथकातील (Subordinate Mineral Squad) तलाठी प्रदिप इंगोले, नामदेव ढोले, मगेश सोरते, मिलीद गरपाळ, संतोष इंगळे, रवि इंगोले यांचे पथक सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी शिवारात 7 फेब्रुवारीला रात्री 11.30 च्या सुमारास गेले होते. ब्रम्हवाडी ते लिंबाळा रस्त्यावर दोन टिप्पर उभे असल्याने त्यांची पाहणी केली असता त्यात 4 ब्रास रेती दिसुन आली. यावेळी पथकाने दोन्ही टिप्पर चालकास रेती वाहतुकीचा परवाना व चलन संदर्भात विचारपुस केली असता त्याने नसल्याचे सांगितले. यावेळी पथक वाहनाची (Squad Vehicle) पाहणी करत असताना दोन कारमधून 7 जण अचानक खाली उतरुन पथकातील कर्मचार्यांना आमच्या वाहनाची तपासणी कशाला करता असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी तलाठी वसंत जाधव यांना पकडुन त्यांच्या तोंडावर चापट मारून इतर कर्मचार्यांना धक्का बुक्की केली. ही मारहाण थांबविण्याचा प्रयत्न वसंत जाधव यांनी केला असता त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर टिप्पर घातले परंतु ते त्वरीत बाजुला सरकल्याने मोठी दुर्घटना टळली. यानंतर चालकानी दोन्ही टिप्परमधील रेती रस्त्यावर सांडुन वाहनासह पलायन केले. यामध्ये प्रत्येकी 15 लाखाचे दोन टिप्पर आणि 22 हजार 400 रुपयाची रेती असा एकूण 30 लाख 22 400 रुपयांचा मुद्देमाल तब्येत घेतल्यानंतरही रेती तस्करांनी घेऊन गेले. या प्रकरणी ग्राम महसुल अधिकारी वसंत जाधव यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण केशव नागरे, शेकुराव गडदे, शिवाजी गडदे, प्रकाश गडदे, जिवन देशमुख यासह दोन्ही टिप्परचे चालक व अन्य दोन व्यक्ती अशा एकूण 9 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. घारगे हे करीत आहेत.




