पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ!
हिंगोली (Hingoli) : जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2024-2025 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती (Public Awareness) होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्ररथाला आज येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Guardian Minister Narahari Jirwal) यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास मदत!
सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृह व निवासी शाळा चालविणे, अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना (घरकुल), सैनिक शाळेतील अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र प्रवर्गाया विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता यासह विविध शासनाच्या कल्याणकारी योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने (District Information Office) आयोजित हे चित्ररथ (Chitrarath) जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रसिध्दी करणार आहे. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून पात्र व गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती!
चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना, बालविवाह प्रतिबंधक कायदा : सन 2006, मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत (Deployment) मागासवर्गीय मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना (Self-Help Groups) मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, रमाई आवास योजना (घरकुल) या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची (Government Welfare Schemes) माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती (Widespread Public Awareness) करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार (MLA) तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी (District Information Officer) प्रभाकर बारहाते, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, आशाताई बंडगर, कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती.