व्यापारी व पत्रकारांच्या कृती समितीने दिला आंदोलनाचा इशारा
हिंगोली (House Tax) : शहरातील घरांना लागणार्या घरपट्टीत अचानक वाढ करण्यात आल्याने हिंगोलीत नागरिकांतून तीव्र पडसाद उमटले आहे. याबाबत सोमवारी व्यापारी व पत्रकारांनी संयुक्तपणे प्रशासनाला निवेदन देऊन वाढ वाजवी करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील आठवड्यात नगर पालिके तर्फे आकारण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कराबाबत व्यापारी व पत्रकारांच्या कृती समितीने प्रशासनाला याबाबत इशारा दिला होता. ठरल्यानुसार सोमवारी कृती समितीतर्पेâ जिल्हाधिकारी व नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
मालमत्ता कराचे नवीन दर ठरविताना याबाबत असलेले अधिनियम, कायदे व शासनादेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा कृती समितीचा आरोप आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय अध्यक्ष असताना या महत्वाच्या बाबीवर निर्णय घेण्यात आला असल्याने सर्वसामान्यांना विश्वासात न घेतल्याची भावना सर्वसामान्यांची झाली आहे. या (House Tax) प्रक्रियेत काम करणार्या अपिलीय समितीमध्ये नगर सेवकांचा समावेश असावा, असा नियम असतांना नगरसेवकच नसल्यामुळे प्रक्रिया अयोग्य असल्याचे समितीचे मत आहे. ही प्रक्रिया राबवित असताना अनेक गोष्टींना फाटा देण्यात आल्यामुळे नागरिकांना अधिकचा भूर्दंड सोसावा लागत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. शिवाय एखाद्याची घरपट्टी थकीत असल्यास त्याला आक्षेप घेण्याची संधीच न देणे म्हणजे घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याने ही पद्धत बंद करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. योग्य पद्धतीने कर आकारणी न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशारा समितीने दिला आहे.
शिष्टमंडळात व्यापारी महासंघाचे नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवाणी, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजीतराज खुराणा, सुधीर अप्पा सराफ, सुमीत चौधरी, मिलींद उबाळे, अ.माबूद बागवान, महेश मोकाटे, मधूसुदन बगडीया, वैâलासचंद्र काबरा, दिनेश बगडीया, सुदर्शन कंदी, बाबा घुगे, कमलकिशोर बगडीया, निरज देशमुख, पुरूषोत्तम चंदनानी, प्रकाश इंगोले, शाम खंडेलवाल, अमितकुमार रूहाटिया, निरज बडजाते, भगीरथ अग्रवाल, अ.वहीद, विजय घुगे, समीर गुंडेवार, शुभम मुंदडा आदींचा समावेश होता.
आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरत्या स्थगितीची सूचना नगर विकास विभागाला दिली आहे.
आ.मुटकुळेंच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी दिली तात्पुरती स्थगिती
हिंगोलीकरांच्या या (House Tax) अडचणीची दखल घेऊन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत पत्र दिले. यामध्ये मालमत्ता करातील ही वाढ अवाजवी असल्यामुळे ही रद्द करावी व नियमित दरानुसार वाढ लागू करावी, अशी मागणी आ.मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सध्या मंत्रीमंडळाचे खाते वाटप झालेले नसल्यामुळे नगर विकास मंत्र्यांचेही अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.मुटकुळेंच्या पत्राची दखल घेऊन नगर विकास विभागाला हिंगोलीची कर वाढ तुर्त स्थगित करावी व याबाबत सविस्तर माहिती सादर करावी असे आदेश दिले आहेत.