पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला जिल्हा विकास आराखडा व जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा.
हिंगोली (Hingoli) : हिंगोली जिल्ह्याच्या शिक्षण, आरोग्य, वीज, पर्यटन, कृषि, सिंचन यासह विविध क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत (State Level Meeting) हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Guardian Minister Narahari Jirwal) यांनी यावेळी केले.
येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य विभागाने पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्या!
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, आरोग्य विभागातील (Health Department) रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. डोंगरी विकास योजनेतून डोंगरी भागातील अंगणवाड्यांचे बांधकाम करावे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्ते व पूल पुरात वाहून गेले आहेत. ते प्राधान्याने दुरुस्त करावेत. सीसीटीव्ही व इतर सुविधेसाठी निधीची आवश्यकता असल्यास तशी मागणी नोंदवावी. तसेच ग्रामीण रस्त्याची कामे मागणीप्रमाणे पूर्ण करावीत. आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांला आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2024-25 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांनी सन 2024-25 अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने (Government Machinery) तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले. यावेळी आमदार राजू नवघरे यांनी शाळा खोल्याचे बांधकाम, शाळेला कंपाउंड वॉल, सिध्देश्वर धरणावर पर्यटन स्थळ विकसित करणे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणे यासह विविध कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.
जिल्हा वार्षिक योजनेत निधी मंजूर!
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल (District Collector Abhinav Goyal) यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्यानुसार पुढील पाच वर्षात कृषि, सिंचन, फळबाग लागवड, हळद लागवड, उद्योग व स्वयंरोजगार, पर्यटन यासह विविध विषयावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजनेत सन 2024-25 या वर्षासाठी 277 कोटी रुपयाचा निधी मंजूर असून आतापर्यंत 110 कोटी निधी प्राप्त झाला आहे. 241 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत विविध यंत्रणांना 81 कोटी रुपये वितरीत करण्यात आले असून त्यापैकी 66 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
शासनाकडून (Government) उर्वरित निधी प्राप्त होताच संबंधित यंत्रणेला निधी वितरीत (Distribute Funds) करुन शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिली. तसेच सन 2025-26 चा 186.59 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली. यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, समाज कल्याण आयुक्त यादव गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक सुनिल बारसे तसेच सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.