नागपूर (Nagpur Hit and run) : नागपुरात मध्यरात्री दिघोरी चौकाजवळ भीषण अपघात घडला. मध्यरात्री एका वेगवान कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या 8 जणांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले. वाठोडा पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना असून, कारचालक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या अपघाताबाबत वाठोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय दिघे यांनी माहिती दिली.आरोपी भूषण लांजेवार हा विद्यार्थी असून, अपघातादरम्यान तो मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेबाबत कळताच वाठोडा पोलीस स्टेशनच्या पथक घटनास्थळ गाठले. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर कारचालक भूषण लांजेवार याला अटक करण्यात आली.
माहितीनुसार, हा अपघातादरम्यान मध्यरात्री दिघोरी चौकाजवळ फुटपाथवर काही लोक झोपले होते. ते रस्त्यावर खेळणे विकून उदरनिर्वाह करणारे लोक होते. उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि कार फुटपाथवर चढली. फुटपाथवर झोपलेल्यांपैकी एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाठोडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.