वर्धा(Wardha):- मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार वर्धा मतदारसंघातील गृह मतदानाला आज (दि.८) पासून सुरुवात झाली.
राहुल कर्डिले यांनी वर्धा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष केली पाहणी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वर्धा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. गृह मतदानासाठी घरी येणाऱ्या मतदान पथकांचे आभार मानत दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांनी आपला हक्क बजाविला. वयोवृद्धता, दिव्यांगत्व (disability) यामुळे मतदान केंद्रावर जाणे शक्य होऊ शकले नसते, मात्र गृह मतदान सुविधेमुळे मतदान करता आल्याचा आनंद यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर झळकला.
जिल्ह्यात एकूण चार मतदार संघ आहेत, यात वर्धा मतदार संघात 343 वयोवृद्ध तर 78 दिव्यांग, आर्वी मतदार संघात 240 वयोवृद्ध, 82 दिव्यांग, देवळी मतदार संघात 306 वयोवृद्ध , 87 दिव्यांग, हिंगणघाट मतदार संघात 320 वयोवृद्ध 85 दिव्यांग , जिल्ह्यात एकूण 1209 वयोवृद्ध आणि दिव्यांग 332 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाकडे नोंद केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी दिली.
वेगवेगळे मतदानाचे पथक गृह मतदानाकरिता आजी आजोबांचे व दिव्यांगाचे मतदान करून घेणार
चारही मतदारसंघात वेगवेगळे मतदानाचे पथक गृह मतदानाकरिता आजी आजोबांचे व दिव्यांगाचे मतदान करून घेणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी आज तुकाराम वार्ड रामनगर वर्धा भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत पहिले मतदान (Voting)झाले. शारदा कृष्णराव दांडोडकर यांना विधानसभा क्षेत्रासाठी आपला लोकप्रतिनिधी निवडण्याकरिता मतदान करण्याचा मान मिळाला. तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वर्धा संतोष पुंडेकर आणि निवडणूक पथक उपस्थित होते. मतदानाचा कार्यक्रम तीन दिवस ८, ९, आणि १० नोव्हेंबर रोजी असणार आहे. अशी माहिती तहसीलदार संतोष पुंडेकर यांनी दिली.