हिंगोली(Hingoli) :- शहरातील आदर्श महाविद्यालय परिसरात असलेल्या बाईक मित्र दुचाकी दुरूस्तीच्या गॅरेजवर आलेल्या ग्राहकापैकी कोणाचा तरी लॅपटॉप (Laptop) विसरुन राहिला होता. त्यानंतर गॅरेज चालकाने दोन दिवस प्रतिक्षा पाहुन हा लॅपटॉप सायबर सेलच्या स्वाधीन केला. सायबर सेलने तपास लावुन संबंधित ग्राहकाला लॅपटॉप परत दिल्याने गॅरेज मालकाचा प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
गॅरेज चालकाने हा लॅपटॉप सायबर सेलच्या स्वाधीन केला
हिंगोली शहरातील जिजामाता नगर भागातील मंगेश मुरलीधर देशपांडे (लोहगावकर) यांचे बाईक मित्र हे दुचाकी गॅरेज आहे. १२ जानेवारी रोजी त्यांच्या गॅरेजवर ३ ते ४ दुचाकी स्वार वाहन दुरूस्तीसाठी आले होते. त्यांचे वाहन दुरूस्त केल्यानंतर ते निघुन गेले होते. सायंकाळी गॅरेज बंद करीत असताना मंगेश देशपांडे यांच्या निदर्शनास लॅपटॉप दिसुन आले. नेमके हे लॅपटॉप कोणाचे विसरले याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे त्यांनी दोन दिवस लॅपटॉप नेण्याकरीता कोणी येते का याची प्रतिक्षा पाहिली. परंतु कोणीही लॅपटॉप घेण्याकरीता आला नसल्याने त्यांनी थेट सायबर सेलकडे संपर्क साधून ग्राहकाचा विसरुन राहिलेला लॅपटॉप पोलीसांच्या स्वाधीन केला.
सायबर सेलमध्ये लॅपटॉपची पडताळ
यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक नागोराव देशपांडे (लोहगावकर) यांची ही उपस्थिती होती. जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्र्गदर्शनाखाली सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, दत्ता नागरे यांनी लॅपटॉपची माहिती काढली. ज्यामध्ये हिंगोली तालुक्यातील थोरजवळा येथील मारोती पांडुरंग पठाडे यांचा हा लॅपटॉप असल्याची खात्री पटली. त्यावरून मारोती पठाडे यांना सायबर सेलमध्ये बोलावुन सदर लॅपटॉपची पडताळणी करून १५ जानेवारीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. गॅरेज मालक मंगेश देशपांडे लोहगावकर यांनी प्रामाणिकपणा दाखवून त्यांच्या गॅरेजवर विसरुन राहिलेला लॅपटॉप पोलीसांच्या सहाय्याने परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे