हिंगोली (Hingoli):- वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रीया सुरू झाली असून पहिली फेरी पूर्ण झाली आहे. अद्यापही हिंगोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्यता मिळाली नसल्याने यावर्षी हिंगोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Medical Colleges) सुरू होण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत.
शासन आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा ह पुढार्यांनाही नाही देणे घेणे
राज्य शासनाने (State Govt) प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा केल्यानंतर हिंगोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी दिवंगत खासदार राजीव सातव यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर प्रशासनाने या प्रकरणाकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे गतवर्षी जागा नसल्यामुळे हिंगोलीचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकले नव्हते. त्यानंतर सबंध वर्षभर याकडे कोणीही लक्ष दिले नाही. काही महिन्यापूर्वी केंद्र शासनाच्या समितीने पाहणी करून शिक्षक व आवश्यक त्या साधन सामुग्री नसल्यामुळे यावर्षीही परवानगी नाकारली. वास्तविक नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या गोंधळामुळे या कमतरता पूर्ण करण्याची संधी होती.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अनास्थेपोटी या बदल्या होऊ शकल्या नाहीत
मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. दरम्यान अधिष्ठात्यांनी या बाबत नॅशनल मेडीकल कौन्सिलकडे (National Medical Council) अपील दाखल केली. इतर जिल्ह्यातून प्राध्यापक मंडळी येण्यास तयार असताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अनास्थेपोटी या बदल्या होऊ शकल्या नाहीत. या दरम्यान वैद्यकीय प्रवेशाच्या दोनच फेर्या शिल्लक असल्याने आता परवानगीची आशा मावळली आहे. असाच प्रकार मागील वर्षी परभणीत झाला होता. त्यावेळी परभणीतील जनतेने जन आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे परभणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मागील वर्षी सुरू झाले. हिंगोलीकरांनाही यासाठी जन आंदोलन करावे लागेल अशी चर्चा होत आहे.