मानोरा (Washim):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महीलेला महिन्याकाठी १५०० रूपये मानधन मिळणार आहे.
२१ ते ६५ वयोगटातील महिलेला महिन्याकाठी १५०० रूपये मानधन मिळणार आहे
दरम्यान, ही योजना जाहीर होताच ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत घराघरात सध्या केवळ लाडक्या बहिणीचीच चर्चा रंगत आहे. कुटुंबातील प्रत्येक जण आपल्याघरातून किती महिला या योजनेच्या लाभार्थी ठरू शकतात याचा कानोसा घेत आहेत. तसेच इतर योजनेच्या लाभार्थी नसलेल्या सर्वच महिला सध्या लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्राची पूर्तता करतांना दिसत आहेत. दरम्यान बहिणीच्या कागदपत्राची पूर्तता करतांना दाजीबाना चांगलाच घाम गाळावा लागत आहे. अनेक जावाई सासुरवाडीत फोनकरून आपल्या मुलीचे टी सी सह कागदपत्र पाठवा म्हणून साकडे घालत आहेत. तर तिकडे सासरे व सालेबुवा कागदपत्रासाठी शाळेचे उंबरठे झिजवत आहेत.
शाळेतील कागदपत्राची मागणी वाढल्याने मुख्याध्यापकाची गोची होत आहे
एकाच वेळी शाळेतील कागदपत्राची मागणी वाढल्याने मुख्याध्यापकाची(headmaster) गोची होत असुन दररोज प्रवेश रजिस्टरमध्ये नावे शोधण्याचे एकमेव काम लागले आहे. तर सर्वच जण आताच कागदपत्र द्या, अशी विनवणी करतांना दिसत आहे. अश्यावेळी या कागदपत्रासाठी आलेल्या प्रत्येकाचेच मान राखताना शाळा प्रशासनाची चांगलीच कसरत होतांना पहावयास मिळत आहे. ज्या कुटुंबात महीला जास्त आहेत, अश्या घरातून कोणत्या महिलांची योजनेसाठी निवड करायची यासाठी घरात सल्ला मसलत सुरू आहे. तर आपलेच नाव योजनेसाठी पुढे यावे म्हणून चांगलीच चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
प्रत्यक्षात सदर योजना किती फलदायी ठरणार हे पाहण्यासाठी अजून वेळ आहे. परंतू सध्या तरी घराघरातून लाडक्या बहिणीच्या योजनेची मात्र जोरात चर्चा सुरू आहे. आता लाडक्या बहिणीला १ जुलै पासून बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.