मानोरा (Washim):- तालुक्यात सर्वात जास्त पेरा असलेल्या सोयाबीन पिकावर हुमनी अळी व पिवळा मोझकचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा उत्पादनात घट येण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सोयाबीन संदर्भात आधीच संभ्रमात असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
उत्पादनात घट होण्याची शेतकऱ्यांना चिंता
एकीकडे मागील वर्षापासुन सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी (Farmer)आर्थिक संकटात असताना दुसरीकडे यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनवर हुमनी अळी व पिवळा मोझक रोगाने आक्रमण केल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रोगावर उपाययोजना म्हणून महागडे औषधीची फवारणी(Medicinal spray) शेतकरी करत आहेत. तरी पण रोगांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. सद्यस्थितीत सोयाबीन पीक फुलावर आणि कळी भरण्याच्या अवस्थेत असुन काही भागात शेंगा धरत आहे. पिवळ्या मोझकने सोयाबीनचे पान पिवळे पडून फुले व कळ्या गळत आहे. तर हुमनी अळी भरलेल्या शेंगा खात पिक नष्ट करत आहे. पिवळा मोझक व हुमनी अलीने सोयाबीन पिक धोक्यात आली आहे. खरीप हंगामावर शेतकऱ्याची वर्षभर व्यवहाराची दारोमदार असते. मोझक रोग व हुमनी अलीमुळे सोयाबीन पिकांचे उत्पादन ५० ते ६० टक्के घट येवू शकते. कृषि विभागाने (Department of Agriculture) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
रूई, गोस्ता परीसरात पिवळा मोझक रोग व हुमनी अळीच्या प्रादुर्भावाने शेतातील सोयाबीन पीक नष्ट होत आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेत मालाच्या उत्पादनात होणारी घट व मालाला असणारे कवडीमोल भाव लक्षात घेता सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी लागलेला खर्चही निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे नुकसानीचे सर्व्हेक्षण व पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद (Zilla Parishad) सदस्या सौ. नंदाबाई उकंडराव राठोड यांनी केली आहे.