परभणी/गंगाखेड(Parbhani):- भरधाव वेगात परभणीकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती, पत्नी जखमी झाल्याची घटना दिनांक ११ जून मंगळवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास खळी पाटी ते सूनेगाव पाटी दरम्यान घडली. दोन्ही जखमींना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे.
पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओची दुचाकीला धडक
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील बळीराम बापूराव खटिंग वय ५० वर्ष व त्यांच्या पत्नी काशीबाई बळीराम खटिंग वय ४५ वर्ष राहणार महातपुरी ता. गंगाखेड हे दांपत्य मानवत तालुक्यात अंत्यविधीसाठी हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीवरून जात असताना दिनांक ११ जून मंगळवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी खळी पाटी ते सुनेगाव पाटी दरम्यान आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ (क्रमांक एमएच ४६ एपी १६८४) वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने खटिंग दांपत्य (couple) रस्त्यावर पडले. अपघाताची घटना घडताच स्कॉर्पिओ चालकाने वाहन घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्कॉर्पिओ वाहनात दुचाकी अडकल्याने त्यास वाहन घेऊन पळून जाता आले नाही. अपघाताचा आवाज ऐकुन परिसरातील ग्रामस्थ धावत अपघातस्थळी येत असल्याचे पाहून स्कॉर्पिओ चालक व त्यातील अन्य व्यक्तींनी तिथून पळ काढला. उत्तम लांडगे, योगेश शिंदे आदींनी गंगाखेड येथील रावण भालेराव यांची खाजगी रुग्णवाहिका (Ambulance) बोलावून दोन्ही जखमींना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलविले आहे. यातील काशीबाई बळीराम खटिंग यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकिय (Medical) सूत्रांनी सांगितले आहे.