पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आदेश
हिंगोली (Husband Murder Case) : हिंगोली येथे पत्नीचा गोळी झाडून खून करणारा पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत करून त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुरुवारी २६ डिसेंबर रोजी काढले आहेत. या शिवाय वसमत पोलिस ठाण्याच्या शस्त्रागारातून पिस्टल कधी काढले याचीही चौकशी केली जात आहे.
वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी विलास मुकाडे याने बुधवारी २५ डिसेंबर रोजी हिंगोली येथे त्याच्या सासुरवाडीला येऊन पत्नी मयुरी मुकाडे यांच्यावर गोळी झाडून खून केला. तसेच सासू वंदना धनवे, मेहुणा योगेश धनवे व मुलगा श्रीयांश मुकाडे यांच्यावरही (Husband Murder Case) गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वंदना यांच्या शरीरातून एक गोळी तर योगेश यांच्या शरीरातून तीन गोळ्या शस्त्रक्रिया करून काढण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर नांदेड येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असून योगेश यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस कर्मचारी विलास मुकाडे याच्यावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात खूनासह भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुरुवारी २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांला ताब्यात घेतले असून २७ डिसेंबर शुक्रवार रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आरोपी पोलिस कर्मचारी विलास मुकाडे यास तडकाफडकी निलंबीत केले असून त्याच्या विभागीय चौकशीचे आदेश काढले आहेत. विभागीय चौकशीच्या अहवालानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, विलास मुकाडे याने (Husband Murder Case) वापरलेले पिस्टल वसमत शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सुट्टीवर जातांना पिस्टल कधी जमा केले होते. तसेच मुकाडे याने पिस्टल कधी काढले तसेच अधिकाऱ्यांनी शस्त्रागारात भेट देऊन तपासणी कधी केली याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतः पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी वसमत पोलिस ठाण्याला भेट दिल्याचे सुत्रांनी सांगितले.
पोलिस अधिकारी व कर्मचारी कारवाईच्या रडारवर
या प्रकरणात वसमत शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा आहे काय तसेच शस्त्रागार प्रमुखाने मुकाडे याला चाव्या कशा दिल्या याची चौकशी होणार असून या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी कारवाईच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.