समस्त मुस्लिम समाजाचे आंदोलन; हजारोंचा सहभाग!
औसा (I love Mohammed) : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ‘आय लव मोहम्मद’ यांच्या पोस्टरवरून विवाद होऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ औसा येथे समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने (Muslim Society) सोमवारी (दि.29) तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात (March) हजारो नागरिक सहभागी झाले होते.
घोषणा देत मोर्चा दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयावर पोहोचला!
औसा शहरातील किल्ला मैदानावरून सकाळी 11 वाजता मोर्चा निघाला. ‘अल्ल्ला हु अकबर “तेरा मेरा रिश्ता क्या,’ ‘नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’, अशा प्रकारच्या घोषणा देत मोर्चा दुपारी एक वाजता तहसील कार्यालयावर पोहोचला. या ठिकाणी मंचावर शहरातील मौलानांनी रॅलीला संबोधित केले. सर्वांनी शांतीचा मार्ग अवलंबावा, अशा पद्धतीचा उपदेशही यावेळी उपस्थित जनसमुदायाला देण्यात आला. औसा पोलिसांनी (Police) चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता मोर्चेकऱ्यांनी घेतली.
मो. पैगंबरांविषयी अपशब्द वापरणाऱ्याला आम्ही माफ करणार नाही!
आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे की, या देशात आम्ही सन्मानाने जगू व आमच्या भावना कोणीही दुखावणार नाही. असे घडले तर घटनेने दिलेल्या अधिकारानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू. आम्हाला उपदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांनी समस्त जगाला शांतीचा संदेश दिला आहे. शांतीने जगणाऱ्या या समाजाला डिवचण्याचे काम कोणीही करू नये; अन्यथा त्याचे परिणाम खूपच वाईट होतील. आम्ही प्रत्येकाला माफ करतो याचा अर्थ आम्ही अन्याय सहन करणार नाही. माणसाला माणूस म्हणून व स्त्रियांचे अस्तित्व जगाला सांगणारे मोहम्मद पैगंबरांविषयी (Mohammad Paigambar) अपशब्द वापरणाऱ्याला आम्ही माफ करणार नाही आणि तो अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. कारी मो.रफीक, मौलाना अमजद, मौलाना शाज मुफ्ती, हाफीज कलिमुल्ला यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.
