शिवसेना उबाठा व वंचितने निवडणूक विभागाकडे केली होती तक्रार
हिंगोली (MLA Santosh Bangar) : कळमनुरीतील तोष्णीवाल मंगल कार्यालयात आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी भाषणातून बोलतांना जे वक्तव्य केले होते त्याप्रकरणी कळमनुरी पोलिसात अदखलपात्र गुन्हा २० ऑक्टोंबरला दाखल करण्यात आला. राज्यात निवडणूक कालावधीमध्ये हा पहिला अदखलपात्र गुन्हा मानला जात आहे.
कळमनुरी येथील तोष्णीवाल मंगल कार्यालयात आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आदर्श आचार संहिता सुरू असतानाही कळमनुरी विधानसभा मतदार संघातील व्यक्तींना त्यांच्या निवडणूक विषयक हक्क वापरण्यासाठी व्यक्तीला प्रवृत्त करण्याचा अगर असा कोणताही हक्क वापरण्याबद्दल मतदार संघातील व्यक्तींना बक्षिसे देण्याच्या हेतूने लाच देण्याचे कबूल करून ती मिळून देण्याची तयारी दर्शविली व तसा प्रयत्न केल्याचे दिसून आल्याने या संदर्भात कळमनुरी पोलिसात २० ऑक्टोंबरला कळमनुरी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आ.संतोष बांगर यांच्यावर कलम १७० (१) (१) १७३ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
निवडणूक कालावधीत पहिला अदखलपात्र गुन्हा दाखल
आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी कळमनुरी येथील कार्यक्रमात जे वक्तव्य केले होते त्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षा तर्फे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील व वंचित बहुजन आघाडी तर्फे निवडणूक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून निवडणूक विभागाने आ.बांगर यांना चोवीस तासात खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावरून आ. बांगर यांनी २० ऑक्टोंबरला खुलासाही सादर केला. त्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजता कळमनुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आ.संतोष बांगर यांच्यावर आचार संहिता भंगाचा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा पहिलाच अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असल्याचे बोलले जात आहे.