हिंगोली शहरातील घटना
नगर पालिकेच्या पथकाने उपसला कारवाईचा बडगा
हिंगोली (Illegal Banner) : शहरात अनाधिकृत होल्डींग, बॅनर, पोस्टर, प्लेक्स आदींवर नगर पालिकेची करडी नजर असताना महाराजा अग्रसेन पुतळ्यालगत एका भावी नगरसेवकाचे अनाधिकृत बॅनर दिसून आल्याने हिंगोली शहर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली शहरामध्ये अनाधिकृत होल्डींग, बॅनर, पोस्टर, प्लेक्स आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी नगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना दिल्या आहेत. त्यावरून २८ डिसेंबर रोजी नगर पालिकेचे वरिष्ठ लिपीक संदीप घुगे यांच्यासह पथक शहरामध्ये फेरफटका मारून पाहणी करीत असताना महाराजा अग्रसेन चौकामध्ये दुपारी २ च्या सुमारास भावी नगरसेवक साजीद दादा यांच्या वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छांचे (Illegal Banner) व त्यावर अनेकांचे फोटो असलेले बॅनर दिसून आले.
सदरील बॅनर विना परवाना, बेकायदेशीररित्या व अनाधिकृतपणे लावण्यात आले. या बॅनर संदर्भात नगर पालिकेच्या पथकाने संपूर्ण शहानिशा केल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आकाश अशोकराव देशमुख यांनी रितसर तक्रार दिली. त्यावरून रोहित पोतलवार रा.हिंगोली यांनी विना परवाना, बेकायदेशीररित्या व अनाधिकृतपणे बॅनर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोटे हे करीत आहेत.
रितसर नोंद करूनच बॅनर लावावे- मुख्याधिकारी अरविंद मुंढे
मुंबई येथे लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या बॅनरमुळे (Illegal Banner) मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे न्यायालयाने या संदर्भात सक्तीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हिंगोली शहरात बॅनर, होल्डींग, पोस्टर, प्लेक्स लावण्या संदर्भात कर आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी नगर पालिकेत रितसर अर्ज करून कर भरणा करूनच बॅनर, होल्डींग, पोस्टर व प्लेक्स लावावेत. कोणत्याही ठिकाणी अनाधिकृत बॅनर, होल्डींग, पोस्टर व प्लेक्स आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई अथवा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी दिला आहे.