मानोरा(Washim):- शेंदूरजना आढाव चौकी हद्दीमध्ये गुन्हेगारी सोबतच अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून शेंदूरजना आढाव परीसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. वरली, मटका, अंदर बाहेर फटका आदीसह देशी विदेशी नकली दारु खुलेआम राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा जागरूक नागरिकांमधून होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकानी या अवैध धंद्यांवर(Illegal activities) आळा घालण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची मागणी होत आहे.
बिट जमादार व ठाणेदाराचा आशीर्वाद
शेंदूरजना आढाव पोलीस चौकीमध्ये अवैध धंदे सर्वत्र फोफावले असल्याने पोलिसांचे अस्तित्वच कोठे दिसून येत नाही. काही ठिकाणी तर पोलीस आणि अवैध धंदे करणाऱ्यांचे सबंध इतके मधूर आहेत की, जणू काही पोलिसाकडून अवैध धंदे करणाऱ्यांना कोणताही धोका कधीच होणार नाही. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या (Police station) हद्दीमध्ये अवैध नकली दारु, मटका, जुगार, गुटखा, अवैध प्रवासी वाहतूक तसेच कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची वाहतूक होतांना दिसते. चौकीतील बिट जमादार अवैध धंदे करणाऱ्या जनावर तस्करी व वाहनधारक, जुगार मटका, गुटखा आदी धंदे व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याची चर्चा परीसरात आहे. बिट जमादाराला ठाणेदार व त्याचा ठराविक हप्ता दिला की करवाईतून मुक्तता दिली जाते. यामध्ये वरीष्ठ अधिकाऱ्यापासून ते पोलीस शिपाई पर्यंत शामील असल्याचे समजते. हप्ता थकल्यावर मात्र पोलीसाकडून अवैध धंद्यांवरती कारवाई होते. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित पोलीस हद्द चौकीची तपासणी मोहीम सुरू केल्यास सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसल्याशिवाय राहणार नाही.