कार्यवाहीकडे महसुल विभागाचे दुर्लक्ष!
मानोरा (Illegal Minor Minerals) : तालुक्यातील मोजे गिरोली येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आजूबाजूला तीन ठिकाणी गौण खनिज तस्करांनी गौण खनिजाची रस्त्याच्या कडेलाच साठवणूक केली असुन याबाबत ग्रामस्थानी महसूल विभागाने (Department of Revenue) पाहणी करून चौकशी करण्याचे कळवून देखील कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सविस्तर असे की, मौजे गिरोली हे गाव मानोरा तहसीलपासून जवळपास १७ ते १८ किलोमीटर अंतरावर आहे. तालुक्यापासून गाव दूर आणि हा भाग डोंगराळ असल्याने या भागात गौण खनिज, रेती तस्करी, चुरी आदींची ट्रॅक्टर व टिप्परने तस्करी करणारे सक्रीय झाले आहेत. गिरोली गावातील ग्राम पंचायतचे आजूबाजूला विना रॉयल्टी मुरूम तीन ठिकाणी आणून साठवणूक केलेली आहे. यासंदर्भात ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांना कळवून देखील पाहणी करून चौकशी करण्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे समजते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी एका निसर्ग प्रेमी नागरिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली आहे.
गिरोली हे गाव तालुका ठिकाणापासून दूरवर आहे. या भागात गौण खनिज, रेती तस्कर रात्रभर वाहनाच्या सहाय्याने तस्करी करून लोकांची झोप मोड करीत आहेत. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने खुलेआम अवैध धंदे करणाऱ्यांचे फावत आहे.




