पाथरी (Illegal sand theft) : परभणी/पाथरी तालुक्यात दिवसा अवैध वाळू उपसा व वाहतुक होत असल्या संदर्भात माध्यमांमधुन बातम्या येत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. अवैध वाळू उपसा करणारे हायवा ट्रक पलटी झाल्यानंतर सहा तासापेक्षा जास्त वेळ जागीच असताना कारवाईची संधीही महसुल प्रशासनाने सोडली. वाळू माफियांनी नेहमी प्रमाणे प्रशासन काही करणार नाही, असे गृहीत धरून मोठी यंत्राना कामाला लावत, हा हायवा घटनास्थळावरून पसार केला.
पाथरी तालुक्यात दिवसा अवैध वाळूचोरी
पाथरी तालुक्यातील मरडसगाव, गुंज, गौंडगाव, उमरा , डाकुपिंप्री , लिंबा व आता कानसुर गावातही गोदावरी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. गौण खनिज उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून म्हणावे, तसे प्रयत्न होत नसल्याने माफिया दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाळू, माती या गौणखनिजाचे अवैध उत्खनन करत आहेत.
अवैध वाळूचोरीचा पॅटर्न हायवा पल्टी झाल्याने उघड
चोरून लपून रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन सुरुवातीला केल्यानंतर आता दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैध गौणखनिज उत्खनन सुरू करण्यात आले आहे. उमरा गावाशेजारील गोदावरी नदी मधून अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा हायवा ट्रक, उमरा गावापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्यावर चढत असताना रस्त्या शेजारील नाल्यामध्ये पलटी झाला. विशेष म्हणजे, हायवा या ठिकाणी सहा तासापेक्षा अधिक काळ पलटलेल्या अवस्थेमध्ये होता.
उमरा गावाशजोरील घटना
यादरम्यान, प्रशासनाला हायवा अवैधवाळूसह पकडून कारवाई करण्याची संधी होती. मात्र प्रशासनाचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी फिरकला नाही. वाळू माफियांनाही कोणी येणार नाही, याची पक्की माहिती असावी. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी क्रेन व जेसीबी बोलावून घेत आरामात हायवा ट्रक या ठिकाणाहून काढत पसार केला. दरम्यान, मंगळवारी या घटनेचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल. त्यामुळे घटनेची सर्वत्र चवीने चर्चा झाली.
कारवाईची संधी असताना प्रशासनाचे दुर्लक्ष
विशेष म्हणजे, या हायवा ट्रकचा गाडी क्रमांक ही फोटो सोबत व्हायरल झाला असताना, प्रशासनाकडून मात्र कारवाईचा कोणताही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. संबंधित वाळू माफीयांचा शोध घेत सदरील वाहन व त्याच्या मालकावर कारवाई होणार का? असा प्रश्न आता तालुक्यातील जागरूक नागरिक विचारू लागले आहेत.