सेनगाव तालुक्यात अवैध रेतीचे तीन टिप्पर व एक ट्रॅक्टर पथकाने पकडले
हिंगोली (illegal sand ) : सेनगाव तालुक्यातील अवैध रेती उत्खननावर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले असताना २ ते ५ मे दरम्यानच्या कालावधीत तीन टिप्पर व एका ट्रॅक्टरमधील अवैध रेती प्रकरणात वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. जिल्ह्यात अवैध रेती उत्खननावरून महसूल प्रशासनावर टिकेची झोड उठविली जात असताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Revenue Division) महसूलच्या पथकाने अनेक ठिकाणी अवैध रेती उत्खनन करणारे वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
अनेक ठिकाणी अवैध रेती उत्खनन
सेनगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध रेती उत्खनन होत असल्याने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह पथकाने २ ते ५ मे दरम्यानच्या कालावधीत विविध ठिकाणी धडक मोहिम राबविली. ज्यामध्ये २ मे रोजी लिंबाळा हुडी येथून अवैध रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर, ४ मे रोजी बन येथून अवैध गौण खनिज वाहतुक करणारा रेतीने भरलेला एक टिप्पर आणि ५ मे रोजी बन येथून अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त करून (Hingoli Police) सेनगाव पोलिस ठाण्यात जमा करण्यात आलेले आहे.
६० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या पथकाने एका आठवड्यात तीन टिप्पर व एक ट्रॅक्टर जप्त करून सेनगाव पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये जवळपास ६० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून (Hingoli Police) सेनगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या पथकामध्ये उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह सेनगाव तहसीलदार सखाराम मांडवगडे, उपविभागीय कार्यालयाचे अव्वल कारकून जी.डी. शिंदे तसेच सेनगाव तहसीलमधील मंडळ अधिकारी शेख अल्लाबक्ष, शिवानंद झोळगे, प्रदिप इंगोले, पंजाब होडबे, पुरूषोत्तम हेंबाडे, ज्ञानेश्वर खेलबाडे, सुनिता खंदारे, महेश गळाकटु, तलाठी आणि प्रल्हाद घोडके कोतवाल यांचा समावेश आहे.
पथकाने धडक कारवाई सुरूच
दरम्यान, सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी गट क्र. ७ मधील नदी पात्रात अवैध बोटीद्वारे रेतीचे उत्खनन होत असल्याने २० एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह पथकाने अचानक भेट देऊन रेती उत्खनन करणारी बोट, सेक्शन पाईप, लोखंडी पाईप, ड्रम साहित्य जप्त करून २० एप्रिल रोजी बोट ब्लास्टींगद्वारे नष्ट केली होती. एकुणच परिस्थितीत सेनगाव तालुक्यातील अवैध रेती प्रकरणात उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या पथकाने धडक कारवाई सुरूच ठेवली आहे.