15 लाख 64400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
परभणी (Illegal sand transport) : गंगाखेड येथे पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार 4 जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यवाह्यात अवैधरित्या (Illegal sand transport) वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून 15 लाख 64400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील मसला येथील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा केल्या जात असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस रविंद्रसिंह परदेशी यांच्या पथकातील सपोनि रामकिशन नांदगावकर, सपोउपनि शेख रियाज, जमादार विशाल लाड, सय्यद ईदरीस, पो. शि. मो. अबूजर आदींनी बुधवार 4 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मसला गावातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर, चार फावडे, सहा टोपले आदी साहित्यासह ताब्यात घेत 8 लाख 57 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक लक्ष्मण पांडुरंग शिंदे व ट्रॅक्टर मालक कशिनाथ सोपान शिंदे रा. मसला यांच्याविरुद्ध (Illegal sand transport) वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार लक्ष्मण कांगणे, राहुल परसोडे, दिलीप निलपत्रेवार, पो.शि. परसराम गायकवाड, शरद सावंत आदींसह गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार संभाजी शिंदे आदींनी रावराजूर येथून धनेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून अवैधरित्या विनापरवाना वाळू घेऊन जाणारा ट्रॅक्टर थांबविला असता पोलीस आल्याचे पाहून चालकाने ट्रॅक्टर जागीच सोडून पळ काढला त्या चालकाचे नाव गजानन तोरणे रा. रावराजूर असे असल्याचे समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Illegal sand transport) वाळूने भरलेला ट्रॅक्टर गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा करत 5 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक गजानन तोरणे व ट्रॅक्टर मालक नाव माहित नाही अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्याचा तपास अनुक्रमे पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, जमादार संभाजी शिंदे करीत आहेत.


