निलंगा(Latur) :- तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या औराद शहाजानी येथील नामवंत शैक्षणिक संस्थेच्या वादग्रस्त न्यायालयीन तक्रारी (Complaints) मागे घेण्यासाठी तक्रारदार व्यापारी दरक यांच्यावर दबाव टाकत भर चौकात जबर मारहाण(beating) करणाऱ्या संस्था चालक व इतरांवर गुन्हे दाखल केल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
जीवे मारण्याचा प्रयत्न
येथील शारदोपासक शिक्षण संस्थेच्या अंतर्गत वादग्रस्त तक्रारी दाखल करणारे येथील प्रतिष्ठित व्यापारी सुंदरलाल दरक हे येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूल शाळेच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आले होते. परत लातूरला जात असताना दोन दुचाकीवरून त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्यामुळे दिसताच दरक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी औराद पोलीस ठाण्यात परत येण्यासाठी सांगितले. त्यामुळे ते परत औराद शहाजानी येथील छत्रपती शिवाजी चौकात येताच संस्थेचे संचालक राजेश वलांडे, बस्वराज वलांडे, अशोक वलांडे, अश्विन वलांडे यांनी संगनमत करुन त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून येत सुंदरलाल दरक यांना ‘तू संस्थेची व आमची बदनामी का करत आहेस ? आणि ह्या सर्व केसेस मागे का घेत नाहीस?’ म्हणून लगेच मारहाण जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या मारहाणीत सुंदरलाल दरक यांचे पाय फ्रॅक्चर झाले व तुळशीची माळ व सोन्याची चैन व रोख रक्कम असलेली पॉकेट गहाळ झाल्याचे सांगितले. त्यावरून व वैद्यकीय जबाबावरुन मारहाण करणाऱ्या संचालक लोकांवर भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा रजीस्टर नंबर २९७/२०२४ कलम ११७ (२) , ११५(२), ३५२ , ३५१(२) , ३(५) नुसार दिनांक १८ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांचे मार्गदर्शनखाली हेड कॉन्स्टेबल श्रीनिवास चिटबोणे यांचेकडे सोपविण्यात आला आहे.