उदगीर (Latur):- बंद पडलेला हक्काचा दूध डेअरी प्रकल्प, नव्याने चालू करून उदगीर मतदारसंघातील युवकांना रोजगार मिळवून देणार असल्याचे आश्वासन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यासोबत, त्यांनी मागच्या दहा वर्षात डेअरी का सुरू झाली नाही.? असा गंभीर सवाल उपस्थित करून तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांच्याच आश्वासनांचा त्यांना विसर पडला असल्याचे चित्र दिसत आहे. पाच वर्ष वजनदार मंत्रिपद भोगूनही उदगीरची आस्मिता आलेली डेअरी बनसोडे यांनी सुरू करता आली नसल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बनसोडे यांच्याकडून उदगीरकरांचा वचनभंग, आंदोलनातून संताप
हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प आपल्या मतदारसंघात असताना, बनसोडे यांच्याकडून कोकणातील बंदरावर उदगीरच्या तरुणांना नौकरी देण्याचे नवे आश्वासन दिले जात आहे. सदरील प्रकार म्हणजे, फक्त मते मिळविण्याचा फंडा असून जनतेतून क्रीडामंत्र्यांच्या (Sports Minister) भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे. हजारो कोटी रुपये मतदारसंघाच्या विकासासाठी आणल्याचा दावा करणारे मंत्री डेअरी(Dairy) सुरू करण्यासाठी शंभर कोटी आणू शकत नाहीत का.? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहेत. आज जरी मंत्र्यांची अर्थपूर्ण चुप्पी असली तरी, याचे उत्तर त्यांना आगामी निवडणुकीत जनतेला द्यावे लागेल हे निश्चित.
आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एखादा प्रकल्प भंगारात निघणे म्हणजे तेथील लोकप्रतिनिधींचे ते अपयश मानले जाते. पण, प्रकल्प भंगारात गेला पाहिजे या उद्देशानेच जर का त्यांची भूमिका असेल तर मग अशा लोकप्रतिनिधीला निवडून देणे, हे तेथील जनतेचे दुर्दैव असते.! डेअरी बंद पडणार असल्याचे प्रकरण जेंव्हा उजेडात आले तेंव्हा, सुरुवातीच्या काळात संजय बनसोडे पुढाकार घेतील असे चित्र होते. मात्र सुरुवातीचा काळ वगळता मंत्र्यांची भूमिका डेअरीबाबत उदासीन दिसून आली आहे. त्यामुळे, आता सदरील प्रकरण स्वतः जनतेनी हातात घेतले असून डेअरीचा नटबोल्टही उचलू देणार नसल्याची कडक भूमिका घेतली आहे. गुरुवारी, डेअरी समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.