कासारशिरसी(Latur) :- आठ दिवसात सोयाबीन हमीभावाबद्दल निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिले. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 6 हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे मनसेच्यावतीने कासारशिरसीत औशाचे आ. अभिमन्यू पवार यांच्यामार्फत राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे (Minister of Agriculture) पटेल यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आली. यावेळी पटेल यांनी ही ग्वाही दिल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार यांनी दैनिक ‘देशोन्नती’ला सांगितले.
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची ग्वाही
निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथे भाजपाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे कृषिमंत्री यांना एक लेखी निवेदन देऊन सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित पाशा पटेल यांनी हे आश्वासन दिल्याचे बिराजदार यांनी सांगितले. किमान आधारभूत किंमत (हमीभाव) ही योजना शेतकरी हिताची आहे व केंद्र सरकारने यावर्षी सोयाबीनला ४८९२/- रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. परंतु खरिपातील नवे सोयाबीन बाजारात येऊ लागताच शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी केली जात आहे. तर यावर्षी अतिवृष्टीने सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असून शेतकऱ्याला दिला जाणारा हमीभाव फार कमी असून यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा जास्त दराने खरेदी करण्याची सक्ती सरकारने करावी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने ११०८ रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर करावा.
मनसेने केली 6 हजार हमीभाव देण्याची मागणी
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. या सर्व मागण्यांसाठी १९ सप्टेंबरपासून निलंगा तालुक्यातील हरीजवळगा येथे आमरण उपोषण करण्याचा इशाराही पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान निवेदन देण्यासाठी आलेल्या मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार व इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी व्यासपीठावर जाऊ नये, म्हणून दोन तास अडवून ठेवले व पोलीस बंदोबस्तातच निवेदन घेतले गेले, अशी माहिती बिराजदार यांनी दिली.