मुंबई (Mumbai):- राज्यात भाजप (BJP)मोठा भाऊ म्हटले जात असतांना लोकसभेप्रमाणे भाजप विधानसभेला जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने जास्त जागा घेतल्या, तर एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना आणि अजित पवारांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा देणार, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. त्यात महादेव जानकर यांनी 50 जागा मागितल्या आहेत. रामदास आठवले यांच्या पक्षानेही जागा मागितल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर जागावाटपाचे मोठे आव्हान असणार आहे.
महायुती विधानसभा निवडणुकीच्या तयारीला
लोकसभा निवडणुकीनंतर आता महायुती विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीला लागली आहे. सगळ्यांचे लक्ष महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असून, शिवसेना(Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेसनंतर (Nationalist Congress)आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. रासपला लोकसभा निवडणुकीत एक जागा दिली गेली होती. स्वतः महादेव जानकर हे परभणीतून निवडणूक लढले . त्यानंतर आता महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाला किमान 50 जागांची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला किती हव्यात जागा?
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत 100 जागा मागितल्या आहेत. पक्षाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच ही मागणी केली. दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 80 ते 90 जागांची मागणी करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि पक्षाचे नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) या दोन्ही नेत्यांकडून ही मागणी केली गेली आहे. महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे. यापैकी सर्वच पक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मागणीबद्दल भाजप काय भूमिका घेणार आणि किती जागा देणार, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.