हिंगोली(Hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे एका तरुणीने चक्क एका घरात घुसून माझे तुमच्या मुलावर प्रेम आहे, मी आता येथेच राहणार आहे असे सांगत घरातच ठाण मांडले. वारंवार समजून सांगितल्यानंतरही तरुणीने घरातून काढता पाय घेतला नाही. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून औंढा नागनाथ पोलिसांनी (Police) तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे प्रकाश थिटे यांचे कुटुंबीय राहते. 5 सप्टेंबर रोजी थिटे कुटुंबीय जेवण करून घरात बसले असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक एक तरुणी त्यांच्या घरात आली. त्या तरुणीने माझे तुमच्या मुलावर प्रेम आहे. यापुढे मी याच घरात राहणार असे ठणकावून सांगितले. तुम्ही मला घराच्या बाहेर काढले तर मी तुमच्यावर खोटे गुन्हे (Crime)दाखल करेल तसेच आत्महत्या करेल अशी धमकीही थिटे कुटुंबीयांना दिली. या प्रकारामुळे अडचणीत सापडलेल्या थेटे कुटुंबीयांनी त्या तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. नातेवाईकांनी समजून सांगितल्यानंतरही तरुणीच्या वर्तणुकीत फरक पडलाच नाही. तरुणीने घराच्या बाहेर जाण्यास नकार दिला. या प्रकारामुळे प्रकाश थिटे यांच्या कुटुंबीयांनी 12 सप्टेंबर रोजी रात्री थेट औंढा नागनाथ पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी त्या तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार शेख मोहम्मद पुढील तपास करीत आहेत. या प्रकारामुळे औंढा नागनाथ पोलीस देखील चक्रावून गेले असून पोलिसांनी आता त्या तरुणीचा जवाब नोंदविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.