हिंगोली (Hingoli):- सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी चिंचोली येथील यशवंतेश्वर महादेव मंदिर ते खानापुर चित्ता येथील सोमेश्वर महादेव मंदिरादरम्यान भव्य कावड यात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेचे ठिकठिकाणी जेसीबीच्या (JCB)सहायाने फुलांचा वर्षाव करीत भव्य स्वागत करण्यात आले. कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्तांसह महिलांचाही सहभाग होता. हर हर महादेवाचा गजर करीत शिवभक्त कावडमध्ये सहभागी होते.
सकल मराठा समाजाच्या कावड यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी
सोमवार दि.२६ ऑगस्ट रोजी चिंचोली येथील यशवंतेश्वर महादेव मंदिर येथे पहाटे तीन वाजता महाभिषेक, पुजाविधी व महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता ज्येष्ठ विचारवंत, वक्ते प्रदिपदादा सोळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतेश्वर महादेवांची पुजा विधी करुन कावड यात्रेला सुरुवात झाली. यावेळी प्रदिपदादा सोळुंके यांनी कावडधारी शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दिर्घ आयुष्यासाठी व आरक्षण लढयाला यश येण्यासाठी महाराष्ट्रातील ही पहिली कावड समाजाच्या शिवभक्तांनी काढल्याचा आनंद त्यांनी मनोगतातुन व्यक्त केला. सरकारला जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण देणे आवश्यक आहे. अन्यथा या निवडणुकीत धडा शिकविण्याचा इशारा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला. हिंगोलीकरांचे त्यांनीही भरभरुन कौतुक (appreciation) व्यक्त केले. यानंतर कावडयात्रा हर हर महादेवाचा गजर करीत मार्गस्थ झाली. इसापुर येथे कावड यात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. ठिकठिकाणी फराळाचे वितरण शिवभक्तांसाठी करण्यात आले. मार्गस्थ ठिकाणी मार्गस्थांनी भव्य स्वागत केले. शिस्तबद्ध पद्धतीने कावड यात्रा भव्य स्वरुपात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या कावड यात्रेत खानापुर, कनका, लासिना, इसापुर, बोरी, टाकळी, चिंचोली, सावरखेडा, पिंपळखुटा यासह जिल्हाभरातील शिवभक्त सहभागी झाले होते.