हिंगोली(Hingoli):- समाजावर विशेषतः तरुणाईवर होणारे व्यसनांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, त्यांना व्यसनांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून नांदेड परिक्षेत्रात आता, लोकसहभागातून ‘व्यसनमुक्त गाव मोहीम’ ही योजना राबविण्यात येणार आहे.
2 ऑक्टोबर रोजी, ग्रामसभेतून ‘तंटामुक्त गाव समित्या’ स्थापन होणार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत, प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘तंटामुक्त गांव समिती गठीत करण्यासाठी परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यातील प्रत्येक गावात येत्या 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. सदर ग्रामसभेतून, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक तंटामुक्त गांव समिती गठीत होणार असून, तंटे सोडविण्या बरोबरच गावातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी या समितीची पोलीसांना मोठी मदत होणार आहे. सन 2008 मध्ये, राज्य शासनाने तंटामुक्त गांव मोहीम ही योजना सुरू केल्यानंतर, प्रत्येक गावात एक तंटामुक्त गांव समिती गठीत करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी, दिनांक 15 ऑगस्ट नंतर आयोजित होणाऱ्या पहिल्या ग्रामसभेत, यापूर्वी नेमलेल्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्यात काही फेरबदल करावयाचे असल्यास ते करून, अशा गांव समितीस अंतिम स्वरूप देणे आवश्यक आहे. मात्र, असे करताना, ग्रामसभेस यापूर्वी नेमलेल्या सदस्यांपैकी एक तृतीयांश पेक्षा अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येणार नाहीत.
ग्रामरक्षक दलात सुमारे 25 ते 50 होतकरू तरुणांचा समावेश
सदर दिवशी, प्रत्येक गावासाठी एक ग्रामरक्षक (village guard)दल देखील तयार करण्यात येणार आहे. सदर ग्रामरक्षक दलात, गावातील लोकसंख्येप्रमाणे सुमारे 25 ते 50 होतकरू तरुणांचा समावेश असेल. गांव पातळीवर घडणारे मालाविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना रात्रगस्तकामी व गांव पातळीवरील व्यसनमुक्ती साठी अशा ग्रामरक्षक दलांची पोलिसांना मदत होणार आहे. गावातील अवैध दारू(Illegal liquor), प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी, पान मसाला, खर्रा, मावा इत्यादी पदार्थाच्या निर्मूलनासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून प्रत्येक गावात 25 ते 50 महिलांची दुर्गा व्यसनमुक्त गांव समिती देखील याच दिवशी तयार करण्यात येणार आहे. गांव पातळीवर उपलब्ध होणारी अवैध दारू व व्यसनांच्या इतर प्रतिबंधित पदार्थांच्या निर्मूलनासाठी सदर महिला, पोलिसांना मदत करणार आहेत. परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली विशेष पथके गठीत करण्यात आली असून, त्यांच्याकडून अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी धाड सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती निर्भीडपणे पोलिसांना द्यावी व अशा व्यवसायांच्या निर्मूलनासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.