परभणी (Parbhani):- तालुक्यातील पारवा येथे शेत आखाड्यावर दरोडा टाकत महिलेवर अमानुष सामुहिक अत्याचार (torture) करण्यात आल्याची घटना शुक्रवार ३ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची नऊ पथके तयार करण्यात आली.
आखाड्यावर दरोडा टाकत महिलेवर अमानुष सामुहिक अत्याचार
आठवडाभरानंतरही पोलिसांचे हात खाली असून दरोडेखोर मोकाट आहेत.या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील पारवा – जांब रोडवर असलेल्या शेत आखाड्यावर दरोडा टाकत चोरट्यांनी शेत आखाड्यावरील महिलेच्या पतीवर कुर्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. सासुलाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर दरोडेखोरांनी महिलेजवळील दागिने लुटून तिला आखाड्याबाहेरील खोलीत आणले. या ठिकाणी दरोडेखोरांनी आळीपाळीने महिलेवर सामुहिक अत्याचार केला. सदर घटना उघडकीस आल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभिर्य ओळखत विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणीला भेट दिली.
परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणात परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. सदर पथक परभणी जिल्ह्याबरोबर राज्यात इतर ठिकाणी आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र घटनेच्या एक आठवड्यानंतरही दरोडेखोरांचा (Robbers) शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांविषयी नाराजीचा सुर उमटत आहे. शेत आखाड्यावर दरोडा टाकत असताना दरोडेखोरांनी एकाचे नाव घेतले. या बाबत पिडितेने पोलिसांना माहिती दिली. सदर इसमाला पोलिसांनी चौकशीसाठी आणले. मात्र त्याच्या चौकशीतुनही विशेष असा काही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
गुन्ह्याची पध्दत आणि यापूर्वी घडलेले जिल्ह्यातील दरोड्याची प्रकरणे यांचा पोलिसांकडून अभ्यास केला जात आहे. गुन्हा करण्याची पध्दती पाहून या दरोड्यातील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र अद्याप तरी पोलिसांच्या हाताला काहीही लागलेले नाही.




