India vs New Zealand:- भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर चाहत्यांनी प्रशिक्षक आणि कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) निशाणा साधला होता. भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यामुळे घरच्या मैदानावर त्याची 12 वर्षांची अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली. बंगळुरू आणि पुणे कसोटीत भारताचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. आता उभय संघांमधील तिसरा आणि अंतिम सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
अंतिम सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर
अनुकूल निकाल मिळत नसतानाही शास्त्रींनी गंभीरला पाठिंबा दिला असून गंभीर अजूनही त्याच्या कोचिंग कार्यकाळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि त्याच्याकडे अजून बराच वेळ शिल्लक असल्याचे म्हटले आहे. शास्त्री म्हणाले, दोन्ही कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा एकतर्फी पराभव केला. गंभीरने नुकतीच कोचिंगची जबाबदारी स्वीकारली असून इतके चाहते असलेल्या संघाचे प्रशिक्षक बनणे सोपे नाही. गंभीर अजूनही त्याच्या कोचिंग करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात आहे, पण तो लवकरच शिकेल.
भारताने १२ वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली
भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यासह घरच्या भूमीवर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्यानंतर विजयी मालिका खंडित झाली. शेवटच्या वेळी टीम इंडियाला 2012-13 मध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडून 2-1 ने पराभूत केले होते. त्यानंतर भारताने सलग 18 मालिका जिंकल्या. मात्र, आता न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत करून हा क्रम खंडित केला आहे. किवी संघ भारतीय भूमीवर एवढी प्रभावी कामगिरी करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पहिली कसोटी जिंकून न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला होता. आता प्रथमच त्याने भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली कसोटी 1955 मध्ये खेळली गेली आणि दोन्ही देशांच्या 69 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंड संघाने भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली.
भारतीय संघ सलग दोन कसोटीत पराभूत झाला
भारताने मायदेशात सलग दोन कसोटी गमावल्या आहेत. 2012 नंतर टीम इंडियाने घरच्या भूमीवर सलग दोन कसोटी गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2012 मध्ये, इंग्लंडने वानखेडेवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत आणि ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत चार सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव केला. 2000 नंतर 25 वर्षात टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग दोन कसोटी गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या आधी दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती. 2000 मध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला होता. त्यानंतर आफ्रिकन संघाने वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाचा पराभव केला होता.