खड्डे बुजविणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना
परभणी (Shree Ganesha Visarjan) : गंगाखेड शहरात संपन्न होणाऱ्या श्री गणेश विसर्जन दिना निमित्त प्रशासनाकडून विविध उपाय योजना आखण्यात आल्या असुन सोमवार १ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी गंगाखेड शहरातील (Shree Ganesha Visarjan) श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे, लोंबकळणाऱ्या वीजतारा व्यवस्थित करणे, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी सुरक्षा व्यवस्थेबाबत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
शहरातील श्री गणेश विसर्जन (Shree Ganesha Visarjan) मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी करतांना उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत. विसर्जन मार्गावरील लोंबकळणाऱ्या वीजतारा सुरळीत करून आवश्यक ठिकाणी लाईट बसवावे त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गावरील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घेण्यासह परळी रस्त्यावरील सानप यांच्या खदानीजवळ बॅरिकेटिंग उभारून सुरक्षा व्यवस्था काटेकोर करावी अशा सूचना नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या व श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कर्णकर्कश आवाजाचे डीजे न लावता मिरवणुकीत ढोल, ताशे, लेझिम व अन्य पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, पर्यावरण संवर्धन लक्षात घेऊन गोदावरी नदी पात्राऐवजी परळी रस्त्यावर नेमून दिलेल्या सानप यांच्या खदानीतच श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी श्री गणेश भक्तांना केले.
यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, नायब तहसीलदार मो. अजीम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, पेशकार वैजनाथ फड, मंडळ अधिकारी चंद्रकांत साळवे, नपचे सुरेश मणियार, वीज महावितरण कंपनीचे स्वप्नील शेटे, शेख साजीद, अमोल शिंदे, गणेश शिंगाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




