स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
हिंगोली (Hingoli Crime Branch) : जिल्ह्यात जबरी चोरीच्या घटना घडल्याने त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलेल्या सूचनेनुसार पथकाने चोहीबाजूने चोरट्यांचा शोध सुरू केला होता. ज्यामध्ये आसेगाव-वसमत रस्त्यावर झालेल्या जबरी चोरीतील चोरटे नांदेड येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तीन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यार, मोटारसायकल जप्त केली.
वसमत तालुक्यातील आसेगाव-वसमत रस्त्यावर कैलास प्रल्हादराव कदम रा.पाटीलनगर वसमत या व्यापार्यास तीन अज्ञात चोरट्यांनी १९ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास रस्ता अडवून तलवारीने गंभीर जखमी करून जबरीने मोबाईल, रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेट असा ९६ हजाराचा मुद्देमाल जबरीने चोरून नेल्याने (Hingoli Crime Branch) वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक अभ्यास करून गोपनीय माहिती आधारे माहिती घेतली असता हरजोत सिंग चरणजितसिंग बिंद्रा, बलप्रितसिंग भूपेंद्रसिंग कदंब रा.पंचवटीनगर वसरणी नांदेड, रोहित मारोती जाधव रा.शंकरनगर वसरणी नांदेड यांनी केल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड शहरातून तिघांना ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केला असल्याची माहिती देऊन गुन्ह्यातील चोरलेले मोबाईल, मोबाईल डिस्प्ले, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, मोटारसायकल, खंजर असा एकूण दिड लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या आरोपींनी नांदेड शहरात उस्माननगर मालेगाव, पूर्णा, मालेगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ व आसेगाव- वसमत अशा एकूण सहा ठिकाणी जबरी चोरी केल्याचे सांगितले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरीभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, दत्ता नागरे, इरफान पठाण यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्यात (Hingoli Crime Branch) हिंगोली जिल्ह्यातील दोन तर नांदेड जिल्ह्यातील सहा ठिकाणची जबरी चोरी उघड झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची भरारी
जिल्ह्यात अनेक ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी यासह अन्य गंभीर गुन्हे घडले आहेत. (Hingoli Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्यासह पथकाने अनेक गुन्हे उघड करून आरोपी व मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी गुन्हे शाखेचे पथक तपासात नैपूण्य दाखवित असल्याने गुन्हेगार पकडण्यात यशस्वी ठरत आहेत.