पत्रकार परिषदेत वनामकृवीचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांची माहिती
परभणी (International Symposium on Agriculture) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरल इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नेक्स्ट जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा परिसंवाद होणार आहे. १२ ते १४ नोव्हेंबर या दरम्यान परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परभणीत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील (International Symposium on Agriculture) परिसंवाद होत असल्याची माहिती वनामकृवीचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कुलसचिव संतोष वेणीकर, डॉ. उदय खोडके यांची उपस्थिती होती. सदर परिसंवादात देश विदेशातील ५०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ, अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास पद्मभूषण डॉ.आर.एस. परोडा, डॉ. हिमांशु पाठक, पद्मश्री डॉ. मनिंद्र अग्रवाल, डॉ.व्ही.के. तिवारी, रावसाहेब भागडे, कुलगुरु डॉ. शरद गडाक, कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु डॉ. संजय भावे, डॉ. एम.एस. राठोड, अमेरिकेतील परडू विद्यापीठाचे डॉ. किंग्स्ले, डॉ. भिमप्रसाद श्रेष्ठा, डॉ. सय्यद इस्माईल यांची उपस्थिती राहणार आहे.
या (International Symposium on Agriculture) परिसंवादातील विविध कार्यक्रमांमध्ये डॉ. मदन झा, डॉ. मंजीत सिंग हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर परिसंवादाचे आयोजन कृषी विद्यापीठातील दिक्षांत सभागृह आणि कृषी महाविद्यालयात करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीने परिसंवादाचे प्रक्षेपणही केले जाणार आहे. या परिसंवादात शेती, कृषी तंत्रज्ञान, कृषी उद्योग, नवीन कल्पना, कृत्रिम बुध्दीमता, सौर ऊर्जा तंत्रज्ञान यासह कृषी विषयक इतर विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.