पाथरी(Parbhani):- तालुक्यामध्ये चालू असलेल्या अवैध गौणखनिज उत्खनन व चोरी प्रकरणे माध्यमांनी वेळोवेळी
पुराव्यासहीत निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधित विभागाकडून एखाद दुसरी कारवाई करण्यात येत आहे . परंतु अवैध वाळू, माती उपसा व वाहतुक थांबण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली नाहीत.
अवैध रित्या माती उत्खनन केल्याच्या घटना
जानेवारी महिन्यापासुन वाळू (Sand)जप्त केल्यानंतर दोन वेळेस हे साठे चोरून नेल्याच्या, अवैध रित्या माती उत्खनन (Excavation of soil) केल्याच्या घटना घडल्या आहेत याप्रकरणी चौकशी किंवा कारवाई संदर्भात कोणतीही हालचाल प्रशासनाकडून झालेली नाही. अद्यापपर्यंत कारवाईचा बडगा उगारला गेला नसल्याने नेमकं अवैध गौण खनिज (minor mineral) उत्खनन प्रकरणी कारवाई न करण्यासाठी दबाव आहे का? किंवा प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
गौणखणीत चोरून नेल्याचे प्रकरण दैनिक देशोन्नतीने उघडकीस आणले
मसला तांडा शिवारातील गट क्रमांक १० मध्ये ६ मे ते १२ मे दरम्यान माती उत्खननाचा परवाना घेत गट क्रमांक ८ च्या बाजूला गोदावरी नदीपात्रामध्ये माती उत्खनन करत मोठ्या प्रमाणावर गौणखणीत चोरून नेल्याचे प्रकरण दैनिक देशोन्नतीने (Deshonnati) ११ मे रोजी उघडकीस आणले होते . या प्रकरणात याठिकाणी प्रशासनाकडून ईटीएस(ETS) मोजणी करत संबंधित व्यक्तीवर कारवाई होणे अपेक्षित असताना आतापर्यंत याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर ईटीएस मोजणी प्रशासनाने करण्याचा प्रयत्न केला तर उत्खनन केलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवण झाल्यावर ते शक्य होणार नाही. त्यामुळे पावसापूर्वी या ठिकाणी महसूल प्रशासनाकडून मोजणी होणे अपेक्षित आहे.
प्रशासनाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
तालुक्यातील उमरा गावाशेजारी अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा क्रं .एम एच २६ बीई ३०७३ पलटी झाल्याची घटना १३ मे रोजी घडली होती . याही प्रकरणी दैनिक देशोन्नती बातमी येत सदरील हायवाचा फोटो व हायवा क्रमांक नमूद करूनही महसूल विभागाकडून याप्रकरणी कोणतीही कारवाई किंवा पोलिसात तक्रार देण्यात आलेली नसल्याने एकूणच प्रशासनाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत .विशेष म्हणजे हा हायवा ट्रक आजही शहर व ग्रामीण भागामध्ये खुलेआमपणे रस्त्यावर फिरत आहे.
डाकू पिंपरी नदीपात्रा शेजारी १०० ब्रासहून अधिक अवैध वाळूसाठा
३० जानेवारी रोजी तालुक्यातील डाकू पिंपरी नदीपात्रा शेजारी १०० ब्रासहून अधिक अवैध वाळूसाठा (Illegal sand stock) सज्जाचे तलाठी अरविंद चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणचा वाळू साठा जागेवरच घरकुल लाभार्थी यांना वाटप करणे किंवा जागीच लिलाव करणे आवश्यक असताना पाथरी येते १३ मोठ्या वाहनांच्या साह्याने आणण्यात आला होता . या वाहनांचे भाडे कसे दिले हा संशोधनाचा विषय आहे .दरम्यान २ फेब्रुवारी रोजी आणला गेलेला सर्व वाळू साठा रात्रीत गायब झाला होता . महसूल प्रशासनाकडून अद्याप पर्यंत याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही .