परभणी (Parbhani):- भ्रष्टाचार्यांना सर्वात जास्त भाजपमध्ये थारा असून भ्रष्टाचार्यांचा खरा म्होरक्या भारतीय जनता पार्टीतच (Bharatiya Janata Party) असल्याची अप्रत्यक्ष टिका अमित शहा यांच्यावर जयंत पाटलांनी परभणी येथील निष्ठावंतांच्या मेळाव्यात केली.
परभणीतुन भाजपवर जयंत पाटलांची टिका
परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवार २६ जुलै रोजी शहरातील राष्ट्रवादी भवनात निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विजय गव्हाणे, माजी आ. विजय भांबळे, माजी आ. सिताराम घनदाट, बसवराज पाटील, व्यंकट कदम, महिला जिल्हाध्यक्ष मनिषा केंद्रे, जाकीर अहेमद खान, पंडीत कांबळे, रितेश काळे, तालुकाध्यक्ष गंगाधर जवंजाळ, विकास लंगोटे, सोनाली देशमुख, प्रा. अरुण नेमाडे आदींची उपस्थिती होती.
महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांवर अन्याय आदी प्रश्नांवर महायुतीचे दुर्लक्ष
त्यावेळी पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीकडून जाणकरांना माढ्याची जागा देण्याचे ठरविले असताना अचानक त्यांनी महायुतीत प्रवेश करून परभणीची जागा लढविली. तिकडे विजय पक्का असताना इकडे त्यांना पराभव पत्कारावा लागला. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा विश्वास दुप्पट वाढला असून महाराष्ट्रातील आगामी सरकार हे महाविकास आघाडीचेच असणार आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांवर अन्याय आदी प्रश्नांवर महायुतीचे दुर्लक्ष असून आम्ही त्यांना योग्य तो न्याय देणार आहोत. देशाच्या अर्थसंकल्पात(budget) महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात(assembly constituency) महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.