५ लाख ७ हजार ८२८ रूपयाची फसवणूक
हिंगोली (ISAF Bank Fraud) : सेनगाव येथील(ISAF Bank) इसाफ बँक शाखेच्या वसुली कर्मचार्यांनी २८९ महिलांची ५ लाख ७ हजार ८२८ रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सेनगाव येथे इसाफ बँकेची शाखा असून ग्रामीण भागातील दहा महिलांचे गट या शाखेकडून तयार करून त्या महिलांना प्रत्येकी ४० हजार रूपयाचे कर्ज वाटप केले जाते. या कर्जाची दोन वर्षामध्ये परतफेड करून त्यांच्याकडून ५० हजार ६०० रूपये परतफेड भरून घेतली जाते. त्याकरीता (ISAF Bank) बँकेचे वसुली कर्मचारी प्रत्येक पंधरा दिवसाने संबंधित गावात जाऊन कर्ज हप्त्याची रक्कम महिलांकडून घेऊन त्यांना पावती देत असतात.
इसाफ बँकेचे (ISAF Bank) वसुली कर्मचारी गोवर्धन रमेश चिंचबनकर रा. गांधीचौक भोकर जि.नांदेड, आकाश आनंदराव दुधारे रा. गंदेवार कॉलनी भोकर जि.नांदेड ह.मु.सेनगाव जि.हिंगोली यांनी १५ मे ते ३१ जुलै २०२४ या दरम्यान कर्जदार महिलांकडून कर्ज हप्त्याची वसुली केली. त्यामध्ये गोवर्धन चिंचबनकर याने १७२ महिलांचे ३ लाख ५३ हजार तर आकाश दुधारे याने ११७ महिलांचे १ लाख ५४ हजार रूपये वसूल केले होते; परंतु सदर रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नाही व (ISAF Bank) बँकेतही रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे थकीत रकमेपोटी महिलांचे कर्ज हप्ते या संदर्भात बँकेकडून विचारणा केल्यानंतर त्यांनी कर्जाचे हप्ते नियमित भरल्याचे बँक अधिकार्यास सांगितले. त्यावरून बँकेने सर्व महिलांची चौकशी केल्यानंतर गोवर्धन चिंचबनकर व आकाश दुधारे या दोघांनी महिलांकडून रक्कम घेऊन सुद्धा त्याची पावती न देता रकमेचा बँकेत भरणा केला नसल्याचे तपासात उघड झाले.
याप्रकरणी (ISAF Bank) बँकेचे अधिकारी लवकुश जाधव यांनी २५ सप्टेंबर रोजी सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गोवर्धन चिंचबनकर व आकाश दुधारे या दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस.बी.स्वामी हे करीत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून सेनगाव पोलिसांचे पथक आरोपीच्या तपासासाठी मागावर आहेत. सेनगाव इसाफ बँके तर्फे रक्कम वाटप केलेल्या २८९ महिलांनी ५ लाख ७ हजार ८२८ रूपये कर्मचार्याकडे देऊनही त्याने रक्कम भरणा केली नसल्याने दोघांवर सेनगाव पोलिसात गुन्हे दाखल केले.