अर्धातासानंतर अधिकाऱ्यांनी करून घेतली सुटका
हिंगोली (Jal Jeevan Mission) : हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे जल जीवन मिशनच्या विहीरीचा पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराला गावकऱ्यांनी घेरावा घालून चांगलेच धारेवर धरले. संतप्त गावकऱ्यांच्या तावडीतून अर्ध्या तासानंतर गावकऱ्यांनी कशीबशी सुटका करून घेतली. शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला आहे.
तालुक्यातील नांदूरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम झाले आहे. या (Jal Jeevan Mission) योजनेसाठी एका शेतकऱ्याच्या शेतात विहीरीचे खोदकाम देखील झाले असून विहीरीला पाणी देखील लागले आहे. त्यानुसार या विहीरीवरून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात होता. मात्र संबंधित शेतकऱ्याने या विहीरीवर विद्युतपंप बसवून शेती सिंचनासाठी या विहीरीतील पाण्याचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे विहीरीच्या पाण्याची पातळी कमी झाली असून गावात मागील चार दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे शुक्रवारी ३ डिसेंबरला दुपारी गावातील महिलांसह काही गावकऱ्यांनी रिकामे हंडे घेऊन जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी गावकऱ्यांनी उपविभागीय अभियंत्याच्या दालनात ठिय्या मांडला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकरी माघारी परतले.
दरम्यान, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल सोळुंके, अभियंता संदेश जाधव यांच्यासह कंत्राटदार तालुक्यात (Jal Jeevan Mission) नळ योजनेच्या कामावर भेटी देण्यासाठी गेले होते. नांदूरा हे गाव याच मार्गावर असल्यामुळे अभियंत्यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नांदूरा शिवार गाठले. अधिकारी शिवारात आल्याची माहिती मिळताच काही गावकरी दुचाकीने तर काही जण पीकअप वाहनाने शिवारात आले.
यावेळी त्यांनी अभियंत्यांना घेरावो घातला. सायंकाळच्या वेळी काय पाहणी करण्यासाठी आले, गावात पाणी नसतांनाही दोषीवर कारवाई का केली जात नाही अशी गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. (Jal Jeevan Mission) काही गावकऱ्यांनी चक्क अभियंत्यांना वाहनातून खाली खेचण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी दगडहाती घेऊन वाहनावर दगडफेक करण्याची तयारी केली.
मात्र अभियंत्यांनी काही गावकऱ्यांच्या मदतीने संतप्त झालेल्या गावकऱ्यांची समजूत काढत अर्ध्यातासानंतर सुटका करून घेतली. सायंकाळी साडे सहा वाजता अभियंत्यांचे पथक नांदूरा शिवारातून बाहेर पडले अन त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.