डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटलांनी गाजवली जाहीर सभा!
देऊळगावराजा (Dr. Rajendra Shingane) : भास्कररावांपासून हा शिंगणे परिवार शरद पवारांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. पवार साहेबांवरती शिंगणे साहेबांचे प्रेम सर्वशृत आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर सर्वात आधी साहेबांजवळ कोणी आले असेल तर ते डॉ. राजेंद्र शिंगणेच. त्यामुळे शाहू-फुले- आंबेडकर यांचा विचार जिजाऊंच्या भूमीतून महाराष्ट्रात जाऊ द्यायचा असेलतर, डॉ. शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांना तुम्ही पुन्हा आमदार करा, त्यांना नामदार करण्याची जबाबदारी माझी.. अशी ग्वाही या सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.
सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या प्रचारार्थ आ. जयंत पाटील (Jayant Patil) यांची सभा आज मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी दे. राजा येथे आयोजीत करण्यात आली होती. या राज्याचे दरडोई उत्पन्न कमालीचे घसरले असून अनेक प्रकल्प गुजरातला दिले जात आहेत. या सरकारच्या काळात महाराष्ट्र गुजरातला आंदण दिल्या गेला असून, शिंदे, फडणवीस व अजीत पवारांनी मोदी-शहांचे मांडलीकत्व पत्करल्याचा घणाघात यावेळी जयंत पाटील यांनी केला. त्यांच्या चौफेर भाषणामुळे ही सभा चांगलीच वादळी ठरली.
महायुतीच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे. येथील उद्योग, पाणी, प्रकल्प गुजरातला पळविले जात असताना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या पिछेहाटीचे पाप महायुतीकडून केले जात आहे. राज्यात वाढत्या बेकारी, महागाई, गुन्हेगारीने जनता त्रस्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त करुन.. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांना यांना विजयी करा, तुम्ही त्यांना आमदार बनवा आम्ही त्यांना नामदार बनवतो असे आवाहनही पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख छगन मेहत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर रामप्रसाद शेळके, माझी अर्थ बांधकाम सभापती रियाज का पठाण, विनायक पडघान, तुकाराम खांडेभराड, अभय चव्हाण, नरेश शेळके, बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, सतीश काळे, दादाराव खार्डे, अर्पित मीनासे, विष्णू रामाने, गजानन चेके, कवीश जिंतूरकर, गोविंद झोरे, वसंताप्पा खुळे, प्रमोद घोंगे, रवींद्र इंगळे, प्रा. शिवानंद भानुसे, गणेश सवडे, गजानन पवार, राजू शिरसाठ, प्रा. दिलीप झोटे, राजू चित्ते, सुभाष शिंगणे, अरविंद खांडेभराड, अमोल भट, नितीन शिंगणे, उमेश शिंगणे, विष्णू झोरे, आदिल पठाण यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र डागतांना ते म्हणाले की, लोकसभेत बहिणीला पाडण्यासाठी टोकाची भूमिका घेणार्यांना विधानसभा पराभवाच्या भीतीपोटी महाराष्ट्रातील सर्व बहिणी लाडक्या झाल्या. पण हे सावत्र भाऊ आहेत, हे महाराष्ट्रातील बहिणींना चांगले ठाऊक आहे. सावत्र नव्हे, तर सख्ख्या भावांचे राज्य बहिणींना राज्यात आणायचे आहे, अशा शब्दांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. १० वर्षांपूर्वी उद्योग क्षेत्रामध्ये देशात आघाडाrवर असलेल्या महाराष्ट्राची युतीच्या सत्ताकाळात पिछेहाट झाली. फॉक्सकॉन, टाटा एअरबस सारखे प्रकल्प पळविले गेले. आता पाणीही पळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याविरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून मात्र एक शब्दही निघत नाही. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणार्या महायुतीला या निवडणुकीत जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही पाटील यांनी केला. यावेळी अनेक नेते मंडळींनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन डॉ. शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या विजयाचे आवाहन केले. सुत्र-संचालन अर्जुन आंधळे यांनी केले.
२५ वर्षात काही केलं नसतंतर पाचदा निवडून आलो असतो का? – आ.शिंगणे
‘सुबह का भुला शाम को वापस आया तो, उसे भुला नही कहते.. मैं तो दोपहरकोही वापस आया’ अशी खुमासदार सुरुवात करुन डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी आपण जिल्हा बँकेसाठी त्यांच्यासोबत गेले होतो, मात्र शरीराने पवार साहेबांकडेच होतो.. असे सांगितले. त्यांनीही दिले काय तर बँकेला ३०० कोटी, तेही कर्ज.. अनुदान नव्हे. सर्वजण चूपचाप गेले होते, मी एकटाच सांगून गेलो. पण जेंव्हा पवार साहेबांसोबत परत आलो, तेंव्हा सव्वा वर्षानंतर सुखाने झोप आली. माझ्यावर टिका करतांना विरोधक काहीच केले नसल्याचा आरोप करत आहे. जर मी २५ वर्षांत काहीच केले नसतेतर तुम्ही मला पाचदा आमदार म्हणून निवडून दिले असते का? असा सवाल यावेळी डॉ. शिंगणे यांनी करुन आता त्रिकुटाच्या फसवेगिरीला बळी न पडता महाराष्ट्राच्या अस्मितेची ही निवडणूक असल्यामुळे विचार करुन मतदान करण्याची वेळ आल्याचे, त्यांनी सांगून आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले.