वसमत (Hingoli):- महाविकास आघाडी मध्ये वसमत विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीला (Nationalist Congress) सुटल्यास व पक्षाने मला उमेदवार म्हणून जाहीर केल्यास मी वसमत विधान सभा लढवण्यास तयार आहे असे स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत येथे रविवारी आयोजित करण्यात केलेल्या पत्रकार परिषदेत(Press conference) केले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी आपल्याला निवडणुकीत मदत करावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले दांडेगावकर यांच्या या घोषणामुळे वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वतीने ते उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाले आहे.
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी
वसमत विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे नेतेमाजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे विधानसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसापासून जयप्रकाश दांडेगावकर मतदारसंघातील विविध भागात जाऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. त्यांनी जनसंपर्कही वाढवला आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. वसमत येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या वेळी दांडेगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देऊन आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. या पृष्ठभूमीवर रविवारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
यावेळी बोलताना त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आघाडीच्या वतीने आपण उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. आघाडीमध्ये वसमतची जागा राष्ट्रवादीला सुटली तर आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक दिवसापासून मतदार संघातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे निवडणूक लढवणार असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले. मतदार संघातील विविध भागात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू आहे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. सरकारचे धोरण जनहिताचे नाही. त्यामुळे हे सर्व बिघडलेले वातावरण सुधारले जावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असून या निवडणुकीत सर्वांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आमदार राजू पाटील नवघरे व आपण आमने- सामने निवडणूक मैदानात राहणार का असे विचारले असता दोन पक्षाचे दोन उमेदवार मैदानात राहणारच आहेत.
दांडेगावकर विरुद्ध आमदार नवघरे अशी लढत रंगणार असल्याची शक्यता
त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणुकीच्या रिंगणात उतरावेत लागणार आहे असे त्यांनी सांगितले त्यामुळे आता वसमत विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच माजी मंत्री दांडेगावकर विरुद्ध आमदार नवघरे अशी लढत रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पत्रकार परिषदेद्वारे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा करून त्यांनी निवडणुकीची तुतारी फुंकली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.