परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील घटना
परभणी/जिंतूर (Jintur School) : पावसामुळे जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. या (ZP School) घटनेत कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. सदरची घटना शनिवार १७ ऑगस्ट रोजी रात्री जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथे घडली. या घटनेनंतर विद्यार्थी, पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सुदैवाने कोणतीही जिवीतहाणी नाही
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (ZP School) पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणाला आहेत. शाळेचे बांधकाम निजामकालीन असून वर्ग खोल्यांचे बांधकाम जीर्ण झाले आहेत. या खोल्या पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडे परवानगी, विनंती, अर्ज करण्यात आले. मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. शनिवारी रात्री झालेल्या पावसात शाळेतील एका खोलीची भिंत कोसळली. रात्रीला ही घटना घडली त्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही. शाळेतील चारही वर्ग खोल्या पडण्याच्या स्थितीत आहेत. विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करावे लागत आहे. सदरील जीर्ण झालेल्या शाळेचा प्रस्ताव २५ जुलै रोजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे दाखल केला आहे, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी जिंतूर त्र्यंबक पोले यांनी दिली.
शाळेत १७९ विद्यार्थी
शाळेची भिंत कोसळल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पालक मुलांना (ZP School) शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या शाळेत १७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
– मुरलीधर हजारे, मुख्याध्यापक प्रा.शाळा पुंगळा