हिंगोली(Hingoli):- भारत निवडणूक आयोगाच्या(Election Commission of India) निर्देशानुसार आज 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आज दि. 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथील सिटी क्लब येथे उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले आहे. तेंव्हा आपणही आपले मतदान करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी येथील मतदान केंद्रावर(Polling stations) असलेल्या सेल्फी पॉईंटवर(Selfie point) सेल्फीही घेतली. सखी मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यापैकी हिंगोली येथील हे मतदान केंद्र महिलाद्वारे संचालित सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी, पोलीस, परिचारिका यांसह सर्वच महिला कर्तव्यावर आहेत. या मतदान केंद्रावर फुग्याचे डिझाईन(Balloon design) करुन, रांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.