दुकाने जळून खाक झाल्यावर आले अग्निशमन दल
जिवती (Jivati Fire) : शहरातील बाजारपेठत असलेल्या प्रितम नगराळे यांच्या आई ऑटोमोबाईल आणि योगेश भदाडे यांच्या किराणा दुकान व कापड केंद्राला शनिवारी मध्यरात्री अचानक भिषण आग लागून दोन्ही दुकाने संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली. या (Jivati Fire) घटनेत आई ऑटोमोबाईल चालक प्रितम नगराळे यांचे जवळपास २५ लाखाचे तर भदाडे किराणा दुकान व कापड केंद्राचे चालक योगेश भदाडे यांचे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
हे दोन्ही दुकाने होलसेल असल्याने मोठ्या प्रमाणात दुकानात सामान भरलेले होते त्यामुळे मोठा नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार प्रितम नगराळे व योगेश भदाडे यांनी नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेत दुकाने बंद करून घराकडे गेले होते. मध्यरात्री अचानक दोन्ही दुकानाला आग लागली होती. या (Jivati Fire) आगीचा भडका आणी धूर शेजारच्या डॉ.अंकूश गोतावळे यांच्या घरात घुसल्याने जाग आली त्यामुळे हि घटना लक्षात आली दुकानाला आग लागल्याची माहिती सदर दुकानदारांना कळवत आग विझविण्यासाठी नगरपंचायतच्या अग्नीशमन दलाला कळविले. मात्र वेळेत अग्निशमन दल पोहोचली नाही.
दोन्ही दुकाने संपूर्ण खाक झाल्यावर अग्नीशमन दल पोहोचले. शहरात अग्नीशमन यंत्रणा राहूनही कामी पडत नसेल आणि वेळेत पोहोचत नसेल तर यंत्रणा काय कामाची असा सवाल उपस्थित होत असून स्थानिक शासन प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दुकानाला लागलेली आग (Jivati Fire) नेमकी कशामुळे लागलेली आहे हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र शार्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. किराणा दुकानातील प्लास्टिक पिशव्या, तेल व कागदामुळे तर लगतच्या ऑटोमोबाईलमधील इंजिन ऑईल, टायर्समुळे आग झपाट्याने पसरली असल्याचे बोलले जात आहे.