जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश : उदगीर बाजार समितीत संयुक्त बैठक
लातूर (Udgir Bazar Samiti) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती आडत बाजारात आता यापुढे मातेरे घेऊ नये तसेच कडताही घेऊ नये, असे निर्देश देत हमाली दराचा नवीन प्रस्ताव आठ दिवसात पाठवावा, अशी सूचना जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या कारभाऱ्यांना केली. ‘उदगीरच्या आडत बाजारात शेतकऱ्यांचे मातेरे!’असे वृत्त ‘देशोन्नती’ने दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक व सर्व संबंधित यंत्रणा कामाला लागली. (Udgir Bazar Samiti) उदगीरच्या बाजार समितीत प्रति क्विंटलला 30 रुपये हमाली घेत सर्रास शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी उदगीरमध्ये मंगळवारी (दि.18) दुपारी जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत उदगीर बाजार समितीचे सर्व संचालक, हमाल मापाडी प्रतिनिधी, खरेदीदारांचे प्रतिनिधी अडत्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Udgir Bazar Samiti) आडत बाजारात शेतकऱ्यांचे अक्षरशः मातेरे केले जात असल्याचे वृत्त ‘देशोन्नती’ने दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. शेतकऱ्यांनी उदगीरच्या आडत बाजारात शेतमाल विक्रीसाठी आणल्यानंतर लूट केली जात आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक हमाली म्हणजे प्रतिक्विंटल ला 30 रुपये इतकी उदगीरमध्ये घेतली जाते. शिवाय प्रतिक्विंटल ला एक किलोचा कडता कापून घेतल्यानंतर पुन्हा शेतकऱ्याचे मातेरे ही लाटले जाते. या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली कायद्यानुसार शेतकऱ्यांकडून करता घेता येणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालातील मातीरेही घेता येणार नाही शिवाय पोत्याला पोत्याचे वजन करणे नियमात असल्याचे यावेळी चर्चेत आले. जिल्हा उपनिबंधकांनी यावेळी मातेरे आणि कडता घेण्याची पद्धत बंद करण्याचे निर्देश दिले. तसेच हमालीचा दर जिल्ह्यात सर्वाधिक असून नवीन दराचा प्रस्ताव येत्या आठ दिवसात पाठवावा, असेही बाजार समितीच्या प्रशासनाला सुचविले.
या बैठकीस (Udgir Bazar Samiti) बाजार समिती सभापती प्रीती भोसले, सचिव प्रदीप पाटील, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्याण हुरदळे, राजाराम पाटील, बालाजी जाधव, कालिदास भंडे यांच्यासह सर्व घटकांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.