‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला…
(Journalism Day 2025) : 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे श्रेय बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. ज्यांनी 1832 साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ (Darpan) आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.
बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण वृत्तपत्र अग्रणी होते…
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र (Newspaper) चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.