क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पोस्टरचे विमोचन
बुलडाणा (Journalist Samvad Yatra) : लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 दरम्यान दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा (Journalist Samvad Yatra) काढण्यात येणार असून, यात्रेच्या पोस्टरचे विमोचन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांच्या हस्ते लातुरात करण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे, शहराध्यक्ष महादेव डोंबे, पत्रकार वाल्मीक केंद्रे आदी उपस्थित होते.
लोकशाहीचा पत्रकारिता चौथास्तंभ मानला जातो. सरकारी व्यवस्थेवर अंकुश आणि समाज जनजागृतीचे व्यापक काम पत्रकारांच्या माध्यमातून अविरतपणे केले जाते. परंतु अलीकडील काळात एकूणच पत्रकारिता अडचणीत आली आहे. परिणामी वृत्तपत्र व्यवसाय आणि त्यावर अवलंबित असणारे पत्रकार आर्थिक अडचणीत आले आहेत. कोरोना महामारीत महाराष्ट्रात 150 पेक्षा जास्त पत्रकारांचा जीव गेला. पण घोषणा करूनही सरकारने मदत केली नाही. अनेक साखळी वृत्तपत्रांनी आपल्या काही आवृत्या बंद केल्याने शेकडो पत्रकार व कर्मचाऱ्यावर अन्याय झाला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या काही पत्रकारांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या. मात्र समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचे दुःख कोणी समजून घेत नाही, हे भयान वास्तव्य आहे. सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या, महागाई वाढली मात्र 12 पाणी वृत्तपत्राची विक्री किंमत पाच रुपयेपर्यंतच आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत केवळ 30 टक्के विक्री किंमत असणारे वृत्तपत्र हे जगातील एकमेव उत्पादन आहे.
जाचक नियमांमुळे मिळत नाही लाभ महाराष्ट्र शासनाने पत्रकारांसाठी काही योजना सुरू केल्या. मात्र जाचक अटीमुळे पात्र पत्रकारांनाही त्याचा लाभ होत नाही. एक दशकांच्या लढ्यानंतर पत्रकार हल्ला कृती विरोधी संरक्षण कायदा मंजूर झाला. मात्र त्याची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नाही. शासनाने बाळशास्त्री जांभेकर सन्मान पेन्शन योजना सुरू केली असली तरी काही अटीमुळे जेष्ठ पत्रकारांना लाभ होत नाही. कागदावर जीएसटी कर लावला, मात्र शासकीय जाहिरातीचे दर त्या तुलनेत वाढवले नाहीत. त्यामुळे जिल्हा पातळीवरील अनेक वर्तमानपत्र बंद पडत आहेत. प्रस्थापित व्यवस्था, स्थानिक प्रशासनविरुद्ध पत्रकारांनी संघर्ष करावा, अशी अपेक्षा ठेवली जाते. परंतु त्यांच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही.
राज्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी
राज्यकर्त्यांनी पत्रकारांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी म्हणून संवाद यात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा नागपूर येथील दीक्षाभूमीपासून निघून मंत्रालयपर्यन्त जाणार आहे. (Journalist Samvad Yatra) यात्रेत राज्यातील विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे व बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष लहाने यांनी केले आहे.