लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ५४१ जागांवर ७ टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. गुजरातमध्ये सुरत मतदारसंघातून मुकेश दलाल आणि मध्य प्रदेशातील इंदोर मतदारसंघातून शंकर ललवाणी हे भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जगभर आता सर्वत्र निकालाची उत्सुकता असून नरेंद्र मोदी तिसर्यांदा सत्ता गाजवणार, की पायउतार होणार याचा फैसला मतमोजणीच्या दिवशी म्हणजे चार जूनला होणार आहे. नरेंद्र मोदी कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवणारच, असा दृढविश्वास ‘मोशा’सह सर्व भाजप समर्थकांना वाटत आहे, तर ‘मोशा’ आपला ‘गाशा’ गुंडाळून संन्यास घेत हिमालयात जाणार, अशी मोदी विरोधकांची खात्री झालेली आहे. बहुमत मिळो न मिळो ‘मोशा’ सत्ता सोडणार नाही, असे मानणारा एक वर्ग आहे. सत्ता कुणाचीही येवो ती लोककल्याणासाठी, लोकशाहीच्या मजबुतीसाठी, संविधानाच्या रक्षणार्थ वापरल्या गेली पाहिजे हा एक विचार प्रवाह भाजप समर्थकांमध्येसुद्धा आहे. दरम्यान, निकाल हाती येईपर्यंत वेगवेगळे मुद्दे जोरदार चर्चेत आहेत. निवडणुकीचा सातवा टप्पा होईपर्यंत अर्थव्यवस्था, सामाजिक सुरक्षा, आरोग्य, सामरिक रणनीती, जलवायू परिवर्तन, बेकारी, महागाई या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श झाला नाही. फोकनाळ गॅरंट्यांनीच निवडणूक गाजली. टी.एन. शेषन यांचा जमाना ज्यांनी पाहिला त्यांनी आताचा आयोग, जो नि:पक्ष स्वायत्त संस्था आहे, तो आयाळ, नख आणि दंतविहीन झाल्याचे पाहिले.
आचारसंहिता भंगाच्या असंख्य तक्रारींच्यासंदर्भात आयोगाने खरगे व नड्डा या पक्षप्रमुखांना नोटिसा पाठवण्यापलीकडे काय केले याचे उत्तर नाही. नाही म्हणायला निवडणूक आयोगाने जवळपास ९ हजार ८८९ कोटींचे घबाड चल- अचल संपत्तीचे जप्त केले आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये ३९५८ कोटींचा हिस्सा ड्रग्जच्या रूपाने जप्त करण्यात आला आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. बेरोजगार आणि बेकारीची तर कल्पनाच करता येत नाही. केंद्र सरकारात दहा लाख पदे दहा वर्षांपासून रिक्त आहेत; पण कोणी बोंबलले नाही. पर्यावरण व जलवायू परिवर्तन या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यांवर एका शब्दाचीही चर्चा निवडणूक काळात झाली नाही. जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये आठ भारतातील आहेत. बिहारसारख्या उद्योग विहीन राज्यातील अनेक शहरे प्रदूषित आहेत. उन्हाच्या काहिलीने सारा देश त्रस्त आहे. कोरोना काळातील असफल प्रबंधनाचा विषय असो, की आरोग्य सेवा कोलमडल्याचा किंवा गंगा नदीतून वाहणार्या हजारो प्रेतांचा विषय असो, दवाखान्यात आणि दवाखान्या बाहेर लोक प्राणवायूसाठी तडफडत होते, पण एकही मुद्दा ऐरणीवर आला नाही, ईव्हीएमवरील संशय दूर झाला नाही.
आणखी दोन-तीन मुद्दे जास्त चर्चेत आहेत. मोदीं समोर एनडीएचे ५४२ उमेदवार ‘बौने’ आहेत हेही दिसले. निवडणूक काळातील प्रचाराचा लज्जास्पद स्तर हाही चर्चेचा विषय आहे. पंतप्रधान पदावर बसलेल्यांचा भाषा आणि संस्कृती विषयक स्तर कसा असावा याचा आदर्श जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी यांनी घालून दिलेला आहे. मात्र, दुर्दैवाने नरेंद्र मोदींनी स्वतःचे हसे करून घेत पातळी हीन दर्जाची ठेवली. म्हैस, मटन, मछली, मंगळसूत्र, मुजरा (सारे मकार), राहुल गांधी मूर्ख और झुठों का सरदार है, असे शब्द वापरून संस्कृती, सभ्यता भाषेच्या सार्या मर्यादा ओलांडत हास्याचा विषय बनले.
काँग्रेस आता प्रेक्षक दीर्घामध्ये दिसणार असे संसदेत सांगणारे आणि काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणारे नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा किती धसका घेतला हे या निवडणुकीत सार्या जनतेने पाहिले. सर्व महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते सतत काँग्रेसवर हमला करीत राहिले आणि आता तर काँग्रेसला नीचतम पातळीवर दाखवण्यासाठी ‘गांधी जगाला चित्रपटातून समजले’, असे सांगून सार्या जगात स्वतःचे अज्ञान प्रगटीकरण करून हास्यास्पद नेत्यांच्या मालिकेत जाऊन बसले. या निवडणुकीत ‘बिलो द बेल्ट’ एकमेकांना ‘हिट’ करण्याची स्पर्धाही दिसली.
‘इंडिया’वाले व्होट बँक के लिये ‘मुजरा’ करेंगे, असे म्हणत मोदींनी काँग्रेसच्या घोषणापत्राची तुलना मुस्लीम लीगशी केली. राबडी देवी, लालूप्रसाद यादव यांनी जशास तसा ठोसा लगावत ‘हम मुजरा करेंगे तो तुम क्या तबला बजाओगे’ या शब्दात मोदींची खिल्ली उडवली. एका भाजप उमेदवारांनी ममता बॅनर्जींना तुझा बाप कोण? असे विचारले होते. मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना ‘जहरीला नाग’, ओवेसींनी आरएसएस का पिट्टू, शरद पवारांनी निर्लज्ज आणि ममता बॅनर्जींनी पापी संबोधले होते. देश भाषा आणि शिष्टाचाराच्या बाबतीत अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीसह अनेक नेत्यांना याचा विसर पडावा हे दुर्दैव आहे. चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने एक महिन्याची मुदत वाढ का दिली? ४ जूनला निवडणूक निकालात गोंधळ झाला तर? मोदी सहजासहजी सत्ता सोडणार काय? लष्करप्रमुखांच्या मुदतवाढीबाबत साहजिकच शंका आणि प्रश्न आहेत. ख्यातनाम पत्रकार हरि शंकर व्यास यांनी लिहिले आहे, की ‘सोशल मीडियावर धोरणात्मक बाबींच्या दोन तज्ज्ञांचे, प्रवीण साहनी आणि अजय शुक्ला यांची प्रतिक्रिया वाचायला मिळाली. प्रवीण साहनी लिहितात- मला मोदी सरकारच्या हेतूबद्दल शंका आहे. सत्ता हस्तांतरण शांततेत होईल की नाही? यामध्ये पांडे आणि अनिल चौहान (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) यांची भूमिका काय असेल? भारतीय लष्कराच्या नेतृत्वावर मी असे कधी लिहीन याची कल्पनाही केली नव्हती!’ कल्पना करा, लष्करी आणि सामरिक घडामोडींचा अनुभवी पत्रकार या शब्दांत चिंता व्यक्त करतो.
लष्करप्रमुखांच्या बातमीबरोबरच अचानक दूरदर्शनच्या रेकॉर्डवरून मोदींच्या इकोसिस्टम पोस्टची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, असे म्हटले जाते. आणीबाणीच्या काळात संजय गांधींच्या भाषणाचा हा ३८ सेकंदांचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ते असे म्हणत आणीबाणीचे समर्थन करत आहेत- बंधू आणि भगिनींनो, गेल्या जूनमध्ये येथे आणीबाणी आली होती. आणीबाणी येताच भारतातील उत्पादनात अचानक वाढ झाली. विद्यार्थी अभ्यास करू लागले. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झाला आहे. (या व्हिडिओ मधून संदेश काय द्यायचा आहे?) दुसरी टिप्पणी अजय शुक्ला यांची आहे. ते लष्करी आणि सामरिक बाबींचे सत्यवादी अभ्यासक आहेत. ते म्हणतात, ‘सरकारला या पदावर लवचिक व्यक्तीची नियुक्ती करायची आहे.’ नरेंद्र मोदी हे देव होण्याचा विचार करत असतील आणि त्यांचे अंधभक्त सतत त्यांना विष्णूचा अवतार समजून आरती करत असतील, तर भविष्यात काहीही शक्य आहे. कैरेबियन सागर आणि उत्तरी अटलांटिक महासागराच्या मध्ये, हिस्पानियोला द्वीपच्या पश्चिमी भागात हैती नावाचा देश आहे. तिथल्या पंतप्रधानांनी स्वतःला अवतार मानले आहे. अंधभक्तांची तिथेही कमी नाही. हैती आज रसातळाला गेलेला देश आहे! आता प्रतीक्षा चार जूनची. मोदींना सत्ता मिळाली, तर ५ पाच वर्षे काय करतील हे अल्ला मौलाच जाणो, पण नाही मिळाली तर? याबद्दलचे ‘भय इथले संपलेले नाही’. म्हणूनच म्हणावेसे वाटते ‘अल्ला जाने क्या होगा आगे’!
न.मा. जोशी
८८०५९४८९५१